निर्माल्य निर्वाणातून नवा उद्योग निर्माण होवू शकतो - माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) – “पंढरपूर हे महाराष्ट्रातील पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे. येथील निर्माल्याचा प्रश्न प्रशासनाला भेडसावत राहतो. निर्माल्याची समस्या सोडविण्यासाठी उद्योजक आणि संशोधकांनी पुढे आले पाहिजे. निर्माल्य निवार्णातून एखादा नवा उद्योग निर्माण होवू शकतो. तुळशीवर प्रक्रिया करून त्यातून नवनवीन उत्पादने घेता येवू शकतात. यादृष्टीने संशोधन व्हायला हवे. पंढरपूर ही आध्यात्मिक राजधानी आहेच; मात्र औद्योगिकदृष्ट्या पंढरपूरचा विकास करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.” असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले. 
              रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा काम्पोनंट ८ अंतर्गत महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता समिती, उद्योजकता सेल आणि वाणिज्य उद्योजकता कौशल्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इंडस्ट्री अकॅडमीया मीट (कॅम्पस टू कॉर्पोरेट कनेक्ट) या उपक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, सकाळ समूहाचे अमोल बिरारी, गंधाली दिंडे, समाधान काळे, अमरजीत पाटील, अमर पाटील, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य प्रा. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळसाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, शिवाजी विद्यापीठाचे डॉ. डी. के. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख मान्यवरांचा परिचय डॉ. अमर कांबळे यांनी करून दिला. 
          कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे पुढे म्हणाले की, “ज्ञानाला कोणत्याही मर्यादा नाहीत. शाळा महाविद्यालयातून मिळालेले ज्ञान समाजजीवनात वापरण्याचे कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाले पाहिजे. सर्वाना सोबत घेवून जाण्यात खऱ्या अर्थाने देशाची प्रगती आहे. त्यामुळे शाश्वत विकास होईल. केलेल्या कामाचे दस्तऐवजीकरण आपणास करता आले तर त्याचा पुढील कार्यासाठी चांगला उपयोग होतो. उद्योजकांनी महाविद्यालयासोबत सामंजस्य करार करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. उद्योजक आणि महाविद्यालये यांनी समान कार्यक्रमाची आखणी केली तर युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.”
         पॅनल चर्चेच्या सत्राचे प्रास्ताविक व सर्व उद्योजकांचा सत्कार प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केला. उपस्थित उद्योजकांनी त्यांच्या इंडस्ट्रीजची माहिती दिली. नाशिक, कोल्हापूर, सांगली, हैद्राबाद, पुणे, सोलापूर, अकलूज, मुंबई इत्यादी ठिकाणाहून पन्नासपेक्षा अधिक कंपन्यानी सहभाग घेतला. औषध निर्माण कंपनी, माहिती आणि तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, खत निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग, कापड उद्योग, प्रकाशन संस्था, साखर कारखाना, टूर्स आणि ट्रॅवल्स, प्रसिद्धी माध्यमे इत्यादी क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होता. पॅनल चर्चेच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे होते. 
          या बैठकीत महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या इंटर्नशिप, हंड्स ऑन अँड ऑन दी जॉब ट्रेनिंग, , रिसर्च प्रोजेक्ट अँड रिसर्च फंडिंग, सामंजस्य करार, प्लेसमेंट, डेप्युटेशन ऑफ फॅकल्टी, स्टुडन्ट फॉर इंडस्ट्री एक्स्पोजर इत्यादीसाठी महाविद्यालयासोबत कार्यरत राहण्याची त्यांनी तत्परता दर्शविली. या चर्चेमध्ये उद्योजकांना आवश्यक असलेल्या बाबींचा अभ्यासक्रमात समावेश कशापद्धतीने असावा. यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)