पंढरपूर दि.07 - जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने धरणात पाणीसाठा कमी आहे. आज धरणातील पाणीसाठा लक्षात घेता पिण्याचे पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी व चारा या बाबींना प्राधान्य देवून ग्रामीण भागात कोणत्याही गावात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी संबधित विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिल्या.
संभाव्य पाणी व चारा टंचाई सदृश्य परिस्थिती निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी पंढरपूर व मोहोळ तालुक्याची आढावा बैठक शेतकी भवन, पंचायत समिती पंढरपूर येथे घेण्यात आली. यावेळी बैठकीस प्रांताधिकारी सचिन इथापे, अजिंक्य घोडगे, तहसीलदार सचिन लंगोटे, सचिन मुळीक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे,, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख तसेच मंडल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी श्री. नाटेकर म्हणाले, तालुक्यात निर्माण होणारी संभाव्य पाणी व चारा टंचाई लक्षात घेऊन त्या संदर्भात तात्काळ उपाययोजना संबंधित यंत्रणेने कराव्यात. जून अखेर पिण्याचे पाणी पुरेल, जनावरांना चारा उपलब्धता या दृष्टीने नियोजन करावे. टंचाई कालावधीत ज्या उद्वभवावरून (पाणी घेण्याचे ठिकाण) पाण्याची उपलब्धता होणार आहे त्याची निश्चिती करून सोर्स मॅपिंग करावे, प्रगतीपथावर असलेल्या पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, विंधन विहीर खोलीकरण करावे ज्या भागात सार्वजनिक विहिरी या आटल्या असतील अशा ठिकाणी खाजगी विहिरी अधिग्रहित कराव्यात. दि.08 मार्च रोजी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार असून हे पाणी शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी भीमा नदीकाठचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून संबंधित साहित्य जप्त करण्यात येणार आहे. त्याच बरोबर आरक्षित पाणी साठ्याचा अवैध उपसा होवू नये, यासाठी आवश्यकती कार्यवाही करावी अशा सूचना महसूल उपजिल्हाधिकारी श्री. नाटेकर यांनी यावेळी दिल्या.
पंढरपूर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली असून, दुष्काळ परिस्थितीत देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू करण्यात येणार असून, तालुक्यात सद्यस्थितीत एकही पाणी पुरवठ्याचा टँकर सुरु नसल्याचे तहसिलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले.
तालुक्यात एक लाख 22 हजार 724 मोठी जनावरे तर 51 हजार 705 लहान जनावरे असे एकूण एक लाख 74 हजार 429 जनावरे असून तालुक्यात एकूण पेरणी केलेल्या क्षेत्रामधून 5 लाख 4 7 हजार 595 मॅट्रिक टन ओला चारा उपलब्ध होणार असून , सरासरी 160 दिवस पुरेल एवढा चार उपलब्ध होईल असे पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. एम. जाधव यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण पाणी पुरवठ्याचे उप अभियंता श्री.पांडव यांनी कासेगांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तांत्रिक कारणांमुळे सद्यस्थितीत बंद असून, ती तात्काळ सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना, टँकरची मागणी होणारी गावे, जल जीवन मिशन मधून करण्यात आलेल्या उपाययोजना, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे, जनावरांच्या तुलनेत चाऱ्याची स्थिती याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला.