सांगोला तालुक्यातून सर्वात जास्त मताधिक्य देण्याचा विश्वास - आ. शहाजीबापू पाटील
सांगोला (प्रतिनिधी) - पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सांगोल्याला सर्वाधिक निधी दिला आहे. विकासाची सर्वात जास्त कामे सांगोल्यात झाली आहेत. ज्यांनी एक रुपयांचा निधी सांगोल्याला दिला नाही अशा व्यक्तींचे समर्थक सोशल मीडियावर टीका टिपण्णी करीत आहेत. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पाच वर्षात झालेल्या विकासकामांची माहिती सोशल मीडियावर टाकून विरोधकांना चोख प्रत्युत्तर द्यावे. गावात विरोधकांचे बूथ लागणार नाही इतके प्रचंड काम कार्यकर्त्यांनी करावे. ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. विरोधकांनी एक उत्तर दिले आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दहा उत्तरे देण्याची तयारी ठेवावी. विकासकामांच्या जोरावर मोठ्या ताकदीने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढवावी असे आवाहन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केले.
माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार २८ मार्च रोजी सांगोल्यात मिरज रोडवरील हर्षदा लॉन्स या ठिकाणी महायुतीचे सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, भाऊसाहेब रुपनर, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, तानाजीकाका पाटील, युवासेना संपर्क प्रमुख सागर पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार, भाजपा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, रासपचे जिल्हाध्यक्ष सोमा मोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शिंदे, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत चव्हाण, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे काम उत्कृष्ट असून राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे काम त्यांनी केले आहे. सिंचन प्रकल्प व रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निंबाळकर यांनी कष्ट घेतले आहेत. दुष्काळी सांगोला तालुक्यात हरितक्रांती झाली असून सर्वच्या सर्व गावे सिंचनाखाली आली आहेत. राजापूर आणि बुरलेवाडी गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ताठ मानेने मतदारांपुढे मत मागायला जावे. सर्वात जास्त मताधिक्य सांगोला तालुक्यातून देण्याचा विश्वास व्यक्त करीत पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना निवडून देणार असल्याचा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.
माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, ही लोकसभेची निवडणुक देशाच्या भवितव्याची आहे. नरेंद्र मोदींनी देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तसेच खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला.