पंढरपूर दि:17- लोकसभा निवडणूक चांगल्या वातावरणात आणि आचारसंहितेच्या नियमावलीत पार पाडण्यासाठी आदर्श आचार संहितेचे सर्वच राजकीय पक्षांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले .
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची व निवडणूक नियुक्त अधिकाऱ्यांची बैठक प्रांत कार्यालयात घेण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगोटे, मदन जाधव, गटविकास अधिकारी किरण मोरे , नायब तहसिलदार जयश्री स्वामी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व नियुक्त निवडणूक अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणूक प्रक्रिया कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. राजकीय पक्षांनी वाहन, झेंडे व फलकाचा वापर करताना आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी प्रचाराचे साहित्य जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून पडताळणी करुन घेणे आवश्यक आहे. मंदिर, मशीद किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करू नये. निवडणूक प्रचार कार्यालय व संपर्क कार्यालय येथे लावण्यात येणारे फलक परवनगी घेवूनच लावावेत.तसेच ग्रामपंचायत स्तरावर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीवर राजकीय पक्षाचे नाव अथवा चिन्ह असेल तर ते झाकुन घ्यावीत. पंढरपूर, मंगळवेढा शहर तसेच ग्रामस्तरावरील फलक तत्काळ काढावेत. निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी 4 भरारी पथके व 4 स्थिर सर्वेक्षण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. असेही प्रांताधिकारी इथापे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.भोसले म्हणाले, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक संदर्भांत विविध परवनगीसाठी प्रांत कार्यालय सांस्कृतिक भवन, पंढरपूर येथे एक खिडकी कक्ष सुरु करण्यात आला असून, त्या ठिकाणाहून आवश्यक परवानग्या घ्याव्यात. परवानाधारकांनी शस्त्रे संबधित पोलीस स्टेशन येथे जमा करावीत. निवडणूक कालावधीत आदर्श आचासंहितेचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.