उमेदवार मी आहे माझ्याशी भिडा, आमदार प्रणिती शिंदे यांची सातपुतेंवर सडकून टीका

0
          सोलापूर (प्रतिनिधी) - सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून मी उभा राहिलेले आहे. सुशीलकुमार शिंदे साहेब नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर भिडायचं असेल तर प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून माझ्यासोबत भिडा, माझ्या वडिलांवर काय आरोप करताय,  अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 

          आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर वडाळा येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुते आणि भाजपावर सडकून टीका केली. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार,  शहराध्यक्ष चेतन नरोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

       आमदार शिंदे म्हणाल्या, माता जिजाऊ, अहिल्यादेवी यांचे संस्कार घेऊन सुप्रिया सुळे आणि मी भाजपसारख्या शत्रू विरोधात लढत आहोत. दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे साहेब आणि शरद पवार साहेब वयाच्या 83 व्या वर्षी लोकशाही संपवायला निघालेल्या भाजपच्या विरोधात खंबीरपणे लढा देत आहेत. असे असतानाही भाजपकडून त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हे दोन्ही ज्येष्ठ नेते महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढा देत असताना भाजपकडून त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत यातून त्यांचे संस्कार दिसत असल्याची टीका यावेळी शिंदे यांनी केली आहे.

        भाजपचे जे उमेदवार माझ्या विरोधात उभे राहिले आहेत त्यांना जनता पार्सल असे संबोधते, असा टोलाही त्यांनी राम सातपुते यांचे नाव न घेता लगावला. तसेच निवडणुकीसाठी मी उमेदवार म्हणून उभी आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माझ्याशी भिडा, वडिलांवरती काय आरोप करता? आणि ज्या माणसाने सोलापूरकरांसाठी संघर्ष केला तो अवघ्या सोलापूरकरांना माहिती आहे तर तुम्ही त्यांना कसले प्रश्न विचारता?  निवडणुकीत मी उमेदवार आहे. तुम्ही माझ्या कामाबाबत बोला, मी लोकांची कामे केली म्हणूनच आमदार झाले, तो पण एक संघर्ष होता. तर जर तुम्ही त्याला संघर्ष मानत नसाल तर तो माझ्या मतदारसंघातील मतदारांचा अपमान असल्याचे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवारावर जोरदार हल्लाबोल केला.

          ही निवडणूक लढवण्यासाठी भाजप उमेदवारांकडे कोणते मुद्देच नाहीयेत गेल्या दहा वर्षात त्यांनी कोणतेही विकासाचे काम केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याची टीकाही आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली. भाजपकडून मागील दहा वर्षात केवळ फसवी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही. मात्र यावेळी आपल्याला लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे आणि जिंकायच्या आहे असे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)