अक्कलकोट दौऱ्यात प्रणिती शिंदेंची भाजपवर टीकेची झोड
सोलापूर (प्रतिनिधी) - भाजपाचे लोकं फक्त आश्वासन वर आश्वासन देतात. आम्ही ते करू हे करू सांगतात. त्याचं काम फक्त कागदावर असते. त्याची अंमलबजावणी तर होतचं नाही. देवेंद्र फडणवीस तर नुसत्या थापा मारतात. ते ‘फसवणीस’ आहेत, अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी भाजपसह फडणवीस यांच्यावर टीका केली. प्रणिती ३ दिवसीय अक्कलकोट दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, मागील दहा वर्षे लोकांनी भाजपवर विश्वास ठेऊन मतदान केले. महागाई कमी होईल, राशन मिळेल, शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल. अशी आशा मतदारांची होती. पण यांनी काहीच केलं नाही. उलट यांनी लोकांचा विश्वासघात केला. मतदारांना एकदा नाही तर दोन वेळा धोका दिला. गॅसचे भाव ३०० वरून १२०० केले. म्हैसलगीसह २८ गावांचा पाणीप्रश्न जसाच तसा आहे. यावर ठोस काहीच झालेले नाही.
मी टक्केवारी किंवा सत्तेसाठी राजकारण करत नाही. मी लोकांसाठी काम करते, असा टोला देखील प्रणिती यांनी नाव न घेता राम सातपुतेंना लगावला. प्रणिती यांनी बेरोजगारी, विमानतळ, पाणी प्रश्न या मुद्द्यावरून देखील विरोधकाना धारेवर धरले. प्रणिती यांनी सुलेरजवळगे, कोर्सेगाव, तडवळ, म्हैसलगी, मंगळूर, हिळ्ळी, गौडगाव, जेऊर आदि गावांना भेटी दिल्या. यावेळी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, शीतलताई म्हेत्रे यांच्यासह परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.