कॉम्प्युटर सायन्स, सिव्हील इंजिनिअरिंग व एमसीए या विभागांचा पालक मेळावा संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी) - गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग व पदव्युत्तर पदवी असलेल्या एमसीए या तिन्ही विभागांतर्फे एकत्रितरीत्या ‘पालक मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याच्या निमित्ताने पालक आणि शिक्षक यांच्यात झालेल्या संवादाचा फायदा विद्यार्थ्यांना होणार हे मात्र निश्चित !
याप्रसंगी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणून महेंद्र घोगरदरे, पांडुरंग ताटे, महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ.प्रतिभा गणेचरी ह्या उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनानंतर कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातर्फे प्रा. व्ही.डी. जाधव, सिव्हील इंजिनिअरिंग विभागातर्फे प्रा. ए.बी. कोकरे तर एमसीए विभागातर्फे प्रा. एम.वाय शेख यांनी आपल्या विभागातील विशेष नोंदी सादर केल्या. यामध्ये प्रयोगशाळेत उपलब्ध यंत्र सामुग्री, मशीन्स यापासून ते इंडस्ट्रीयल व्हिजीटच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कसे कामकाज चालते याचे प्रात्यक्षिक, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी, अत्यंत अवघड असणाऱ्या गेट या परीक्षेतील गणेश कचरे यांनी देशातून ३९ व्या क्रमांकाने मिळवलेले यश आदी बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि उच्च करिअरची दारे खुली होत असल्याचे सांगण्यात आले.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांसंदर्भात विकासात्मक धोरण, नियोजनात्मक मार्गदर्शन आणि उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने स्वेरीत 'गेट' परीक्षेची करून घेतली जाणारी तयारी याबाबत सांगितले. प्रत्येक वर्षी विविध विषयांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित करून तसेच ‘ॲडव्हान्सड टेक्निकल ट्रेनिंग’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अशा परीक्षांसाठी आवश्यक संपूर्ण तयारी करून घेतली जाते. वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या टेस्ट आणि त्यांचे विश्लेषण यामधून विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणातील अद्ययावत माहिती दिली जाते. त्यामुळे स्वेरीतील विद्यार्थ्यांना अशा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळत असल्याचे सांगितले तसेच या परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारे सर्व स्टडी मटेरियल हे स्वेरीच्या नूतन इमारतीत असलेल्या मुख्य लायब्ररीमधून उपलब्ध करून दिले जाते, असे सांगण्यात आले. यावेळी कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.एस.पी. पवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता व स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.पी.एम. पवार व एमसीए विभागातर्फे प्रा. एम.वाय शेख यांच्यासह तिन्ही विभागांतील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
प्लेसमेंट विभागाचे प्रा.ए.ए.मोटे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या ‘गेट परीक्षा, स्वेरीमध्ये येणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या, प्लेसमेंट विभागामार्फत चालणारे कार्य, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीसाठी व करिअर करण्यासाठी आवश्यक बाबी, इंग्रजी भाषा कौशल्ये, संभाषण कौशल्य, सादरीकरण, प्रकल्प, तांत्रिक प्रशिक्षण इंटर्नशीप, स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? हे करताना पालकांनी कोणती भूमिका घ्यावी ? आदी करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची माहिती पालकांना दिली. वसतिगृह व्यवस्थापक प्रा. करण पाटील यांनी ‘स्वेरी अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ३ व विद्यार्थिनींसाठी ३ असे स्वतंत्र असलेल्या वसतिगृहाची आजची स्थिती आणि उद्याचे नियोजन यावर अभ्यासपूर्ण माहिती देवून ‘विद्यार्थी व विद्यार्थिनी हे अभियंता म्हणून बाहेर पडत असताना एक चांगला माणूस म्हणून समाजात वावरणे ही काळाची गरज ओळखून त्यानुसार स्वेरीतून शिक्षण दिले जात आहे.’ हे सांगून ‘पाल्यांच्या वसतिगृहा संदर्भात, विद्यार्थ्यांचे भोजन, राहणे व अभ्यासासंदर्भात काही अडचण आल्यास केव्हाही संपर्क साधू शकता.’ असे आवाहन केले. यावेळी बाळासाहेब अनपट, संभाजी शिंदे, सचिन दिंडोरे, शिवाजी गायकवाड, अभिजित भोसले, सौदागर खांडेकर, विजयकुमार पांचाळ, शिवाजी पाटील, राजेंद्र अन्नदाते, सौ.सुनिता कोल्हापुरे यांच्यासह इतर पालकांनी काही सूचना केल्या असता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता व स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.पी.एम. पवार यांनी काही अडचणी जागीच सोडविल्या तर काही प्रश्न वरिष्ठ पातळीवर सोडविण्याचे आश्वासन दिले.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या पालक मेळाव्यात तिन्ही विभागातील मिळून जवळपास २०० पालक, तसेच विभागातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. पी.व्ही.केळकर यांनी पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन करून आभार मानले.