सोई सुविधेसाठी 1150 कर्मचारी / स्वयंसेवकांची नियुक्ती
दर्शन रांगेसाठी कायमस्वरुपी 4 व्यतिरिक्त 3 अतिरिक्त पत्राशेडची निर्मिती
सप्तमी ते त्रयोदशीपर्यंत पूर्णवेळ मुखदर्शन - श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर
पंढरपूर (प्रतिनिधी) :- चैत्री यात्रा दरवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी या दिवशी भरते. सन 2024 यावर्षी चैत्री यात्रा शुक्रवार, दिनांक 19 एप्रिल, 2024 रोजी आहे. तथापि, श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने दिनांक 15 ते 21 एप्रिल, 2024 या कालावधीत पहाटे 5.00 ते रा.11.00 पर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. या यात्रेला अंदाजे 2 ते 3 लाख भाविक पंढरपूर शहरात असतात. या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
तसेच या यात्रा कालावधीत श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येणार असून, त्याबाबतचे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये नवमीला श्रीरामनवमी जन्मोत्सवा निमित्त श्री. विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी), ह.भ.प.श्री. श्रीकांत महाराज पातकर, पंढरपूर यांचे कीर्तन, श्री.ह.भ.प. आजरेकर महाराज पंढरपूर यांचा द्वादशीला नैवेद्य, त्रयोदशीला श्री.ह.भ.प.गुरू बाबासाहेब आजरेकर महाराज, पंढरपूर यांचे किर्तनाची परंपरा असून, एकादशीला पहाटे श्रींची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य महोदयांच्या शुभहस्ते सपत्नीक संपन्न होत आहे.
आपत्कालिन व्यवस्थेच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिका यांचेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचा-यासह, सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक 100 नग सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाईल लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सुचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलीसी इ. व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्थेसाठी पत्राशेड येथे तालुका आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष, उपजिल्हा रूग्णालया मार्फत दर्शनमंडप येथे आयसीयू तसेच माळवदावर वैष्णव चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा व मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्यावत रूग्णवाहिका ठेवण्यात येत आहेत.
स्वच्छता व्यवस्थेसाठी मंदिर, दर्शनमंडप, तुकाराम भवन येथील स्वच्छता मंदिर कर्मचा-यांमार्फत व नगरप्रदक्षिणा, दर्शनरांग, मंदिर प्रदक्षिणा इ. ठिकाणची स्वच्छता करण्यात येत आहेत. या कामी स्वकाम सेवा आळंदी व संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आळंदी या स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येत असून, स्वच्छतेसाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. तसेच अन्नछत्रामध्ये दु.12.00 ते 2.00 व रा.7.00 ते 9.00 या वेळेत अन्नदान सुरू राहणार असून, दर्शनरांगेत दशमी, एकादशी, द्वादशीला लिंबू सरबत / मठ्ठा व तांदळाची / शाबुदाणाची खिचडी व गोड बुंदी वाटप करण्यात येणार आहे.
दर्शनरांग व्यवस्थापनाच्या दृष्टीने फक्त मुखदर्शन असल्याने, त्यासाठी पदस्पर्शदर्शनरांगेचा वापर करण्यात येणार असून, या दर्शनरांगेत स्कायवॉक पासून पत्राशेड पर्यंत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री टाकणे व कायमस्वरूपी 4 पत्राशेड येथे तात्पुरते 3 असे एकूण 7 पत्राशेड उभारण्यात येत आहेत. या दर्शनरांगेत मॅट, बसण्याची सुविधा, थंड पिण्याचे पाणी, तात्पुरते उड्डाणपुल, शौचालये, विश्रांती कक्ष, बाथरूम, लाईव्ह दर्शन इ. सुविधा उपलब्ध आहेत. तसेच वाढती उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन, पत्राशेडमध्ये कुलर, फॅन व यंदा प्रथमच थंडाव्यासाठी स्प्रिंकरल बसविण्यात येत आहेत. याशिवाय, महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष तसेच श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद व त्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच वेदांता, व्हीडीओकॉन व श्री.विठ्ठल रूक्मिणी या 3 भक्तनिवासामधील 361 रूममध्ये सुमारे 1600 भाविकांची निवास व्यवस्था करण्यात येत आहे.
सदर यात्रा निर्विघ्नपणे - सुरळीत पार पाडण्यासाठी व भाविकांना केंद्रबिंदू मानून त्यांना अधिकाधिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समितीचे सदस्य सर्वश्री आ.रामचंद्र कदम, श्रीमती शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड.माधवीताई निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड परिश्रम घेत असून 1150 कर्मचारी / स्वयंसेवक सेवा पार पाडणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी दिली.