पंढरपूर (प्रतिनिधी) - राज्य परिवहन मंडळाच्या चार्जिंग स्टेशनचे काम रेंगाळले असुन ते त्वरीत सुरू करावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे विभाग नियंत्रकाकडे केली असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
पंढरपूर हे देशातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, राज्यातील सर्वात मोठे बस स्थानक आहे, लाखो भाविक या ठिकाणी प्रवास करतात. राज्यभरातील अनेक आगारातून इलेक्ट्रिक बस सेवा सुरु झाली आहे. मात्र हे महत्त्वाचे ठिकाण चार्जिंग स्टेशन नसल्याने ई बससेवेपासून वंचित आहे.
ही गरज लक्षात घेऊन येथे चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात यावे म्हणून महावितरण व राज्य परिवहन महामंडळाकडे प्रयत्न केले त्याप्रमाणे मागील एक महिन्यापासून चंद्रभागा बसस्थानकात केबल, ट्रान्स्फाॅर्मर इ. साहित्य येऊन पडले आहे तथापि तेथील कोणत्याही प्रकारच्या कामास आजपर्यंत प्रत्यक्षात सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही. या कामास उशीर का होत आहे याची माहिती मिळावी अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे.
तरी जास्तीत जास्त प्रवासी वाहतूक असणाऱ्या पंढरपूर आगारात चार्जिंग स्टेशनचे काम तातडीने, प्राधान्याने व्हावे अशी मागणी ग्राहक पंचायतीतर्फे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा संघटक दीपक इरकल, सचिव सुहास निकते, तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये, संघटक महेश भोसले, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, अण्णा ऐतवाडकर यांनी परिवहन महामंडळाकडे केली आहे.