जिल्ह्यातील सेतू कार्यालये केव्हा सुरू होणार- ग्राहक पंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांंकडे विचारणा

0
     पंढरपूर (प्रतिनिधी) - सोलापूर जिल्ह्यातील मागील वर्षीपासून बंद असलेली सेतू कार्यालये सुरू केव्हा होणार अशी विचारणा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे जिल्हाधिकारी यांचेकडे पत्राद्वारे केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
         सेतू ठेक्याची मुदत संपल्याने मागील वर्षी १ एप्रिल पासून जिल्ह्यातील सेतू कार्यालये बंद आहेत. आता सर्व शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा संपलेल्या असून हे शैक्षणिक वर्ष लवकरच पूर्ण होत आहे. नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी, रेशन कार्ड, व इतर कामासाठी जात, उत्पन्न, अधिवास इ.विविध दाखल्याची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या महा ई सेवा केंद्रावर गर्दी वाढलेली आहे. वेळेत दाखले मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी प्रत्येक तहसीलदार कार्यालय परिसरात सेतू कार्यालये तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. तरी शासनाने नागरीकांना आवश्यक असलेले दाखले वेळेत व सुलभ रीतीने, शासनमान्य दराने  मिळण्यासाठी त्वरीत सेतू कार्यालये लवकरात लवकर सुरू करावीत अशी मागणी अ. भा. ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा संघटक दीपक इरकल, सचिव सुहास निकते, जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर,संतोष उपाध्ये,  तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये, संघटक महेश भोसले, सचिव प्रा. धनंजय पंधे, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)