"मुद्द्याचं बोला ओ"'अभियानांतर्गत साधला संवाद
सोलापूर (प्रतिनिधी) - सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणितीताईं शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी सर्व चालकांच्या वतीने मतांची ओवाळणी देऊन प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्धारही करण्यात आला. मागील दोन वर्ष भाजपच्या खासदारांनी कोणतेही विकासाचे काम केलेले नाही. भाजपकडून केवळ फसवी आश्वासने देण्यात आली. त्यामुळे यावेळी सोलापूरची लेक म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धारही रिक्षा चालक संघटनेच्या वतीने करण्यात आला.
सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा चालक संघटनेच्यावतीने बुधवारी प्रणिती ताई शिंदे यांच्याशी संवाद साधून आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच आजपासून प्रणिती शिंदे यांचा प्रचार सुरू करणार असल्याचेही रिक्षा चालकांनी स्पष्ट केले.
"मुद्द्याचं बोला ओ" या अभियानांतर्गत संवाद साधत असताना रिक्षा चालकांनी यावेळी त्यांच्या दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या समस्या मांडल्या.. पेट्रोल सीएनजीच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत..यावेळी सोलापूरचा खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धारही रिक्षा चालक संघटनाकडून व्यक्त करण्यात आला.
गेल्या दहा वर्षापासून सोलापूर शहराचा विकास रखडलेला आहे. त्यामुळे यावेळेस सोलापुरातून आपल्या हक्काचा उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. म्हणून म्हणून सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा चालक संघटनेने स्थानिक उमेदवाराला निवडून देण्याचा निर्धार केला आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार करणार असल्याचे रिक्षा चालक संघटनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
प्रणिती शिंदे यांनी वेळोवेळी रिक्षा चालक संघटनेच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवला आहे. तसेच मोदी सरकारने जो ड्रायव्हर विरोधी कायदा करण्याचा घाट घातला होता त्याला देखील प्रणिती शिंदे यांनी जोरदार विरोध दर्शवला होता. त्यांची ही कामाची पद्धत पाहता सोलापूर लोकसभेसाठी अशाच एका तरुण तडफदार खासदाराची आवश्यकता होती. त्यामुळेच ज्या प्रमाणे दिवाळी राखी पौर्णिमेला ओवळणी दिली जाते. त्याप्रमाणे रिक्षा चालकांच्या मदतीला धावून येणाऱ्या ताईंना मतांची ओवाळणी देऊन दिल्लीत पाठवण्याचा निर्धार करत असल्याचा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मुद्द्याच बोलायला लावणार, भरकटू देणार नाही...
यावेळी रिक्षा चालकांशी संवाद साधत असताना आमदार प्रणिती शिंदे यांनी मुद्द्याचं बोला हो या अभियानांतर्गत विरोधी पक्षाच्या उमेदवारांना सोलापुरातील विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यास भाग पाडणार असल्याचे स्पष्ट केले. मागील दहा वर्षात भाजपने आणि त्यांच्या सोलापुरातील खासदारांनी आश्वासना व्यतिरिक्त काहीच दिले नाही. यातून मतदारांची फसवणूक झाली आहे. आता त्यांच्याकडे विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखं काही उरलं नाही म्हणूनच ते विषयांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत यासाठी त्यांना मुद्द्यावर बोलण्याचा आग्रह सोलापूरची जनता यापुढे करेल, असा विश्वास देखील प्रणिती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधले. भाजप सरकारने रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली होती. मात्र ते अद्याप प्रलंबित आहे. तसेच शहरातील रिक्षाला देण्यात येणारे खुले परमिट बंद करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय वाहतूक शाखेकडून ऑनलाइन इ चलान पद्धतीने दंडा करण्यात येतो. त्याबाबत वाहतूक शाखेने पुनर्विचार करायला हवी, अशी समस्याही रिक्षा चालक संघटनेकडून मांडण्यात आली.
शहरातील रिक्षा चालकांनी एकत्र येत प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी ऑटो रिक्षा संघटनेचे शहराध्यक्ष विकास काळे, संघटनेचे प्रमुख सल्लागार दिलीप खंदारे, संघटनेचे सेक्रेटरी सुनील शरणाप्पा माने, संघटनेचे खजिनदार नागेश माने, शिवाजी साळुंखे , संस्थापक अध्यक्ष आतिश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष महेश बनसोडे, सोलापूर शहर सचिव सुरज जाधव यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.