महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
सोलापूर (प्रतिनिधी) - महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर मतदारसंघात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी मतदार संघातील कामती(मोहोळ), पंढरपूर आणि सोलापूर शहर या ठिकाणी या सभा पार पडणार असून माजी मंत्री आमदार सतेज पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार विश्वजीत कदम हे दिग्गज नेते सभेला संबोधित करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ दिग्गज नेत्यांच्या तोफा धडणार आहेत. शनिवारी प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी ४ वाजता मोहोळ तालुक्यातील कामती येथे सतेज पाटील, अमित देशमुख, विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत प्रचार सभा पार पडणार आहे. तसेच पंढरपूरच्या कासेगावातील महामाया मंदिर पटांगणात सायंकाळी ठीक ५:०० वाजता हे तिघेही नेते जाहीर सभेला संबोधित करतील.
दरम्यान, मोहोळ, पंढरपुर तालुक्यानंतर काँग्रेसच्या या दिग्गज नेत्यांची सोलापूर शहरात देखील जाहीर सभा पार पडणार आहे. शहरातील लिमयेवाडी येथे एस एल बी रिक्षा स्टॉपजवळील मैदानात सायंकाळी ६.३० वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदारांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.