सीताराम सावंत हा भूमी आणि भूमिकेशी प्रामाणिक असणारा लेखक - श्रीकांत देशमुख

0
           पंढरपूर (प्रतिनिधी)– “सभोवतालची परिस्थिती लेखकाने स्वत:च्या अंत:करणात मुरविल्याशिवाय तिचे प्रतिबिंब साहित्यात येवू शकत नाही. लेखक हा आपल्या भोवतालाशी प्रामाणिक असला पाहिजे. लेखकाचे साहित्य हे दर्जेदार निर्माण होण्यासाठी लेखक डोळस असावा लागतो. सध्याच्या परिस्थितीत खेडी बदलत आहेत. शहरे जवळच्या खेड्यांना गिळंकृत करायला लागली आहेत. आधुनिकीकरणाने लोकांची जीवनशैली बदलली आहे. या बदलामुळे लोकांच्या जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या असून या समस्या साहित्याचा विषय बनल्या पाहिजेत. सीताराम सावंत यांचे लेखन भोवतालच्या समस्यांचे चित्रण करणाऱ्या आहेत. म्हणून सीताराम सावंत हे भूमी आणि भूमिकेशी प्रामाणिक असणारे लेखक आहेत.” असे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी केले.
           रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा काम्पोनंट ८ अंर्तगत मराठी विभाग व प्राध्यापक प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सीताराम सावंत : व्यक्ती आणि वाङ्मय’ या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते. यावेळी मंचावर समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, टेंभूर्णी येथील लेखक प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, माणदेशी साहित्यकार आनंद विंगकर, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, डॉ. भगवान नाईकनवरे, प्रा. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, डॉ. अनिल चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते. 
        श्रीकांत देशमुख पुढे म्हणाले की, “सीताराम सावंत यांच्या साहित्यात माणदेश प्रदेश आलेला आहे. माणदेशातील माणसांच्या जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्याचा श्वास बनले आहे. माणदेश हा नैसर्गिकदृष्ट्या प्रतिकूल प्रदेश असून इथल्या माणसांचा जगण्याचा संघर्ष रोजचाच असतो. सावंत यांनी लेखनात शैलीचे आणि अभिव्यक्तीचे प्रयोग केले आहेत. त्यामुळे त्यांच्या साहित्यातील पात्रे जिवंत वाटतात.” 
या परिसंवादात भूमिका मांडताना आनंद विंगकर म्हणाले की, “सध्या आधुनिकीकरणाने लोकांचे जगणे सुसह्य केले आहे. या सुसह्यतेसोबत आलेला चंगळवाद जोपासण्यासाठी आवश्यक असणारा पैसा मिळविण्याचे लोकांनी विविध मार्ग निवडले आहेत. हे मार्ग निवडत असताना पूर्वीच्या नैतिकतेच धाक राहिला नाही. त्यामुळे समाजात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. सुधारणा होत आहेत, मात्र माणूस सुखी होईल का हे तपासायला हवे. बदलणाऱ्या समाजव्यवस्थेचे चित्रण लेखकांनी आपल्या साहित्यात केले पाहिजे. देशोधडी आणि भुई भुई ठाव दे या कादंबऱ्यातून अशा बदलत्या संस्कृतीचे चित्रण आलेले आहे.”
       प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी सीताराम सावंत यांच्या कादंबरी लेखनाविषयी भूमिका मांडताना जागतिकीकरणाच्या परिणामातून निर्माण झालेल्या समस्या आणि त्याचे सामान्य जनजीवनावर होत असलेले परिणाम विस्ताराने मांडले. ‘सीताराम सावंत यांचे साहित्य हे शेती, शेतमजुरी आणि बाजारीकरण यांचे चित्रण मांडते. गावातला सामान्य माणूस त्याचे बेरोजगारीपण आणि त्यातून निर्माण झालेला संघर्ष हा देशोधडीचा विषय आहे. गावातील दलित समाजातील स्त्री गावच्या सरपंचपदी विराजमान होते. ही बाब प्रस्थापित समाजाला आव्हान ठरणारी आहे. याचे चित्रण सावंत यांच्या साहित्यात येते.’
          प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी परिसंवादात सावंत यांच्या कथाविश्वाविषयी भूमिका मांडली. त्यामध्ये ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ आणि ‘वस्तरा चालविणारी बाई’ यासारख्या कथा समाजातील वेगळेपण चित्रित करणाऱ्या आहेत. सीताराम सावंत हे भोवतालाकडे निरागसतेने पाहतात आणि ही निरागसता त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित होते. सावंत यांनी त्यांच्या कथांमध्ये रहस्य कथांचा रूपबंध वापरला आहे. ‘वामन मोरेचे काय झाले ?’ ही अशाच वळणाची एक कथा वाचकाला शेवट पर्यंत गुंतवून ठेवते. हे सावंत यांच्या लेखनाचे यश आहे.’ 
         या परिसंवादाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “सीताराम सावंत हे रयत सेवक असून ते या शाखेवर कार्यरत आहेत. त्यांच्या साहित्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत असते. त्यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्याची दखल रयत शिक्षण संस्थेने घेतली आहे. सावंत यांच्या लेखनाविषयी चर्चा महाविद्यालयात घडवून आणणे ही आमची भूमिका होती. सावंत यांनी केलेले लेखन हे मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरेल असा विश्वास या परिसंवादातील वक्त्यांनी व्यक्त केला ही रयत परिवारासाठी आनंददायक बाब आहे.” 
          या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत आणि मान्यवरांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी करून दिला. या परिसंवादास सांगोला येथील प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले, मोडनिंब येथील डॉ. वामन जाधव, कल्याण शिंदे, शहाजीराजे बळवंत, प्रकाशक बाळासाहेब धोंगडे आदी साहित्यिक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून प्राध्यापक, शिक्षक, संशोधक, अभ्यासक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘देशोधडी’ या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी, प्रा. हरिभजन कांबळे, प्रा. सारिका भांगे, डॉ. सुमित साळुंखे, प्रा. राजेंद्र मोरे, अभिजित जाधव, सुरेश मोहिते, अमोल माने, नागनाथ खंदारे आदींनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हेमंत गव्हाणे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)