मोहोळ तालुक्यात महायुतीचा झंजावाती प्रचार दौरा
सोलापूर (प्रतिनिधी) - देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मोहोळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्यात येणार आहे, असे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले. भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ शनिवारी माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मोहोळ विधानसभा मतदासंघातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला.
माजी आमदार राजन पाटील म्हणाले, हि देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही भेदभाव न करता नागरिकांना मोफत अन्नधान्याची व्यवस्था केली. शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर सहा हजार रुपये देण्याची सोय केली. मोहोळ तालुक्यात ४० गावांसह तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा सर्वांना ठाम विश्वास आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील मतदारांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहनही माजी आमदार राजन पाटील यांनी केले.
आमदार यशवंत माने म्हणाले, महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी राज्यात सर्व तालुक्यांना मिळाला आहे. त्यामुळे विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. कोणीही भेटून गेले तरी माजी आमदार राजन पाटील हे शब्दाचे पक्के आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा विजय निश्चित आहे, असेही आमदार यशवंत माने यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे. गावागावांमध्ये विकासाची कामे सुरू आहेत. देशाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या पाठीशी उभे राहावे.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते व माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश आवताडे, लोकनेतेचे संचालक संभाजीराव चव्हाण, बाबुराव वाघमारे, राष्ट्रवादीचे युवा नेते सोमनाथ धावणे, सरपंच अविनाश मोटे तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
--------------------------------------------------
काँग्रेसला बूथ एजंटही मिळणार नाही
सोलापूर जिल्ह्यातील मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नेतृत्व हवे आहे. जनतेचा महायुतीला प्रचंड प्रतिसाद आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये काँग्रेसला बूथ एजंटही मिळणार नाही, असे माजी आमदार राजन पाटील याप्रसंगी म्हणाले.
--------------------------------------------------