पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोलापूरकरांना आवाहन : आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ अतिविराट सभा
सोलापूर (प्रतिनिधी) - सोलापूरच्या समृद्धीसाठी सोलापूरला खूप काही देण्याची इच्छा आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरकरांनी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून सोलापूरकरांनी विकासाच्या गॅरंटीला निवडावे, असे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अतिविराट जाहीर सभा सोमवारी होम मैदानावर झाली. अत्यंत उत्साहपूर्ण आणि उत्स्फूर्तपणे हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील, खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. समाधान आवताडे, आ. यशवंत माने, आ. बबनराव शिंदे, आ. शहाजी पाटील, आ. संजय शिंदे, आ. जयकुमार गोरे, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी आमदार राजन पाटील, रश्मी बागल, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, माजी महापौर किशोर देशपांडे, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपाचे प्रदेश निमंत्रित सदस्य उदयशंकर पाटील, माजी महापौर शोभा बनशेट्टी, प्रणव परिचारक, भाजपचे सरचिटणीस रोहिणी तडवळकर, मनीष देशमुख, विशाल गायकवाड, विकास वाघमारे, चन्नवीर चिट्टे, भाजपचे कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, शिवानंद पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, शिवसेना राज्य प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद चंदनशिवे, रिपाइं (ए) चे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, विनायक महिंद्रकर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कलंकित इतिहासानंतरही काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत आहे. काँग्रेसने देशाला भ्रष्टाचार, दहशतवाद, कुशासनात ढकलले होते. जनतेने १० वर्षांचा मोदी सरकारचा सेवा काल पाहिला आहे. जी विकास कामे काँग्रेस ६० वर्षात करू शकली नाही, ती विकासकामे भाजप सरकारने १० वर्षात करून दाखवली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी या घटकांच्या प्रगतीला रोखण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. त्यांच्या मतांचा फक्त वापर केला गेला. मात्र भाजप सरकारने गेल्या १० वर्षात खऱ्या सामाजिक न्यायासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा, मेडिकल परीक्षेत ओबीसी आरक्षण तसेच गरिबांना न्याय देण्यासाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद भाजपा सरकारने केली. भाजप सरकार संविधान बदलणार आरक्षण हटविणार असा खोटा आरोप काँग्रेसकडून केला जातो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. आरक्षणाला जितकी ताकद देऊ शकतो तितकी ताकद देण्याचे काम भाजप करेल. याउलट एस्सी आणि एसटीचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याची काँग्रेसची मानसिकता दिसून येत आहे. ते आम्ही कधीही होऊ देणार नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले.
जर वृत्ती चांगली असेल तर परिणामही चांगले येतात. आमदार राम सातपुते हे लोकसभेत गेल्यानंतर सोलापूरच्या विकासाची कामे करतील. सोलापूरकरांनी कमळाचे बटन दाबले तर ते मत मला मिळेल. घराघरामध्ये जाऊन भाजप सरकारची कामे सांगावी आणि भाजपच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी केले.
--------------------------------------------------
शहिदांचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे : देवेंद्र फडणवीस
निवडणूका होत राहतील. पण पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला भाजपने केला असा आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. हुतात्म्यांचा अपमान सोलापूरकर सहन करणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
--------------------------------------------------
पंतप्रधानांनी केली मराठीतून भाषणाची सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. "माझ्या प्रिय सोलापूरकरांना अतिशय मनापासून नमस्कार. "जय जय रामकृष्ण हरी" सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर चरणी मी नतमस्तक होतो" असे म्हणताच सोलापूरकरांनी त्यांना जोरदार टाळ्यांची दाद देत 'मोदी मोदी' अशा घोषणा दिल्या.
--------------------------------------------------
राम, श्रीराम, नाही आराम
राम सातपुतेंना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत देण्यासारखे आहे. ही निवडणूक देशाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे. सोलापुरात आयटी पार्क व्हावे, असे माझे स्वप्न आहे. सोलापूरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करून ६५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि दुहेरी जलवाहिनीचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. भीमा नदीवर बॅरेज बंधारे बांधणे, विमानसेवा सुरू करणे, डाळिंब, केळी उत्पादकांसह इतर उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेणे अशी कामे आगामी काळात प्राधान्याने करणार आहे. सोलापूरकरांनी या रामाला एक संधी द्यावी. प्रभू श्रीरामांची शपथ घेऊन सांगतो, पाच वर्षे आराम करणार नाही, असा शब्द भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी देताच सोलापूरकरांनी त्यांना प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
--------------------------------------------------
गर्दीचा मोडला विक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेमुळे सोलापुरातील गर्दीचे सर्व विक्रम मोडले गेले. सोलापूरच्या चारही दिशातून नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी होम मैदानावर उस्फूर्तपणे एकत्र येताना दिसत होते. या नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.