रयत शिक्षण संस्थेत नोकरी करताना विठ्ठलाच्या दिंडीत सहभागी झाल्याचा आनंद – प्राचार्य डॉ. जे. जी.जाधव

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) – “विठ्ठलाच्या दिंडीत सहभागी होण्यातून भाविकांना जो आनंद मिळतो. तोच आनंद रयत शिक्षण संस्थेत नोकरी करताना सेवकांना होतो. या संस्थेत प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचार आणि कार्यावर निष्ठा ठेवून काम केले आहे. म्हणूनच रयत शिक्षण संस्थेला आज नावलौकिक प्राप्त झाला आहे. संस्था म्हणजे केवळ इमारत नसते. तर तेथे कार्यरत असणाऱ्या सेवकांनी सेवेतून निवृत्त होताना व्यक्त केलेले समाधान असते.” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव यांनी केले. 
             रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात प्राध्यापक वेल्फेअर समितीच्या वतीने आयोजित ‘शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकां’च्या सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते. यावेळी मंचावर सत्कारमूर्ती उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, इतिहास विभाग प्रमुख प्रोफे. डॉ. हनुमंत लोंढे, हिंदी विभाग प्रमुख प्रोफे. डॉ. फैमिदा बिजापुरे, पर्यवेक्षक प्रा. युवराज आवताडे, प्रा. राजेंद्र शितोळे, प्रा. बाळासाहेब जाधव, प्रा. विलास भोसले, प्रा. शामराव साळुंखे, प्रा. सीताराम सावंत, कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी, प्रयोगशाळा परिचर मधुकर वाकडे, राजू निंबाळकर इत्यादी सेवक त्यांच्या जोडीदारासह उपस्थित होते. 
            प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव पुढे म्हणाले की, “शिक्षक किंवा शिक्षकेतर सेवक जेंव्हा महाविद्यालयात कार्यरत असतो. तेंव्हा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडून जेंव्हा त्याला चांगली साथ मिळते. तेंव्हाच तो आपली सेवा पूर्ण ताकदीने देवू शकतो. रयत शिक्षण संस्था हा एक परिवार आहे. या संस्थेने महाराष्ट्रातील अनेकांचे संसार सुस्थिर केले. म्हणूनच सेवकांकडून संस्थेला मोठ्या स्वरुपात योगदान मिळत असते.” 
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की , “सध्या सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत नव्याने होणारी भरती अत्यल्प आहे. त्यामुळे प्रत्येक सेवकांवर कामाचा ताण येत आहे. आमचे सेवक कर्मवीरांच्या विचारातून प्रेरित असल्यानेच त्यांच्यामध्ये त्यागाची आणि समर्पणाची भावना आहे. प्रत्येक सेवक योगदान देतो. त्यातूनच महाविद्यालयास शिस्त लाभली आहे. महाविद्यालयाच्या प्रगतीत प्रत्येकाचा वाटा मोलाचा राहिला आहे.”
        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक वेल्फेअर समितीचे चेअरमन डॉ. उमेश साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमात सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांचा महाविद्यालयाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यामध्ये शाल, पुष्पहार, कर्मवीरांची प्रतिमा असलेले चांदीचे नाणे असे सत्काराचे स्वरूप होते. यावेळी सेवानिवृत्त सेवकांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास सत्कारमूर्ती सेवकांचे मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भारती सुडके आणि प्रा. सुनिता मगर यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. नामदेव पाटील यांनी मानले. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)