पंढरपूर (प्रतिनिधी) - शहरात दि. २६ रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या उपस्थितीतमध्ये प्रचारसभा पार पडली. या सभेत प्रणिती शिंदे यांनी आक्रमक शैलीत भाजपला धारेवर धरले. प्रणिती शिंदे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, जाती धर्मात तेढ निर्माण करणारे व्यक्तव्य केले. पंतप्रधान मोदींच्या त्या वक्तव्याचा मी निषेध करते. भाजपचे लोक सोलापुरात येऊन जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्नात आहेत.
हा महाराष्ट्र जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. अहिल्या देवींचा महाराष्ट्र आहे. हा रमाईचा महाराष्ट्र आहे, सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे. मी महिला आहे म्हणून लढत आहे. मला महिला म्हणून जिजाऊ, अहिल्यादेवी, रमाई, सावित्री बाई यांचा अभिमान आहे. त्यांनी जो संघर्ष केला. आम्ही तो व्यर्थ नाही जाऊ देणार, असा यल्गार प्रणिती यांनी यावेळी बोलून दाखवला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले
श्री प्रभु रामाचे मंदीर झाले आम्हाला याचा आनंद आहे. पण भाजपचे लोक देवाचा प्रभु रामाच्या नावाचा वापर मत मागण्यासाठी करतात, मतदान हे कामावर झालं पाहिले. तरच लोकशाही जिंवत राहिल. प्रभू रामासोबत कधी तरी विठू माऊलीचा देखील जयजयकार करा. कधी तरी विठू माऊली सोबत सेल्फी घ्या. मंदीर झालं पण अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक का बांधलं नाही, असा संतप्त सवाल देखील प्रणिती यांनी यावेळी भाजपला विचारला.
भाजप रात्री खेळ करणारी पार्टी
ही लढाई आपल्या सर्वांची आहे. भाजपने मागील १० वर्षात फोडाफोडी, आमदारांची खरेदी विक्री केली. यांना फक्त हेच येते. भाजप रात्री खेळ करणारी पार्टी आहे. यामुळं रात्र वैऱ्यांची आहे, म्हणून आपल्याला सावध राहायचे आहे आणि ७ तारखेला भरभरून हाताच्या पंज्यावर मतदान करायचे आहे, असेही प्रणिती म्हणाल्या.
माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, शरद पवार साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि सुशिलकुमार शिंदे साहेब यांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवले. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. पण भाजपने शेतकरी देशोधडीला लावला. भाजपने दुधाला ५ रूपये अनुदान जाहीर केलं आणि हे अनुदान मिळवण्यासाठी १४ अटी घातल्या. या अटी पुर्ण करता करता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले. शरद पवार साहेबांनी एक सही केली अन दुसरीकडे अनुदान जमा केले. याला जाणता राजा म्हणतात, असेही धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.
उजनीला लई कारभारी झालेत
उजनी धरणाला लई कारभारी झाले आहेत. यांचा बंदोबस्त करून उजनीचे व्यवस्थित नियोजन करणार. भाजपने जिल्ह्याची वाट लावली. आपल्याला विकासाची घडी पुन्हा बसवायची आहे. या निवडणुकीत हाताच्या पंजाला भरघोस मतदान करून आपल्याला बीडचे पार्सल परत पाठवायचे आहे. तसेच तुतारी घेतलेल्या माणसाला देखील भरभरून मतदान करून मला आशीर्वाद द्या, असे आवाहन देखील धैर्यशील मोहिते पाटीले यांनी यावेळी केले.
यावेळी व्यासपीठावर भूषणसिंह राजे होळकर, राजे निंबाळकर, प्रवीण गायकवाड, अभिजीत पाटील, यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.