तामिळनाडू येथील कुमारगुरू फाउंडेशन डे निमित्त विश्वधर्मी प्रा.डॉ. वि.दा. कराड पुरस्काराने सन्मानीत
पुणे दि.६ (प्रतिनिधी) :- दूरदर्शी शिक्षण तज्ज्ञ, परोपकारासाठी वचनबद्धता असून देशाच्या सामाजिक विकासावर कायमस्वरूपी प्रभाव टाकणारे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा शनिवारी तामिळनाडू येथे ‘अरूचेलवर डॉ. एन. महालिंगम पुरस्कार’ २०२४ देऊन सन्मान करण्यात आला.
त्यांना हा पुरस्कार सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश थिरू एमएम सुंदरेश यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तामिळनाडूच्या कोयंबटूर मधील कुमारगुरू संस्थेच्या वतिने कुमारगुरू फाउंडेशन डे आणि अरूचेलवर यांच्या जन्मशताब्दी निमित्त डॉ. कराड यांचा सत्कार करण्यात आला. स्मृतिचिन्ह व मानपत्र हे पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष बीके कृष्णराज वनवरायर, कुमारगुरू इन्स्टिट्यूटचे जॉइंट करस्पॉन्डन्ट शंकर वनवरायर व अन्य उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देतांना प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, हा पुरस्कार स्विकारतांना मला अत्यंत आनंद होत आहे. आम्ही संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम यांच्या तत्वज्ञानाचे पालन करून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीची स्थापना केली. जगातील सर्वात मोठ्या डोमची निर्मिती करून संपूर्ण मानव जातीला शांतीचा संदेश देण्याचे कार्य सुरू आहे. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार संपूर्ण भारत माताच संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखविणार आहे. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून येथे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. तसेच मूल्यवर्धीत शिक्षण व विद्यार्थ्यांचे चारित्र्य निर्मितीवर अधिक भर दिला जातो.
या वेळी न्यायाधिश थिरू एमएम सुंदरेश आणि बीके कृष्णराज वनवरायर यांनी आपले विचार मांडले. कुमारगुरू संस्थेच्या लिबरल ऑर्टस अँड सायन्सच्या प्रिन्सिपल डॉ. व्हिजला केनडी यांनी आभार मानले.
अरूचेलवर डॉ. एन. महालिंगम यांच्या संदर्भात -
डॉ. महालिंगम एक यशस्वी उद्योजक, कला क्षेत्राला जपणारे, महान राष्ट्रनिर्माता होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने वर्ष २००७ मध्ये त्यांना पद्मभूषण देऊन गौरव केला. डॉ. महालिंगम हे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पासून प्रेरित होऊन आयुष्यभर गांधीवादी विचारांवर चालले. त्यांनी धर्म, दर्शन, प्राचिन परंपरा आणि साहित्यावर अनेक पुस्तकांचे लिखान केले आहे.