नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेने सोलापूरकर हैराण झाले आहेत. देशातील अनेक राज्यांत सध्या कमाल तापमानाने उच्चांक गाठला आहे. उष्णतेच्या तीव्रतेने अंगाची लाही लाही होत आहे. सर्वचजण मान्सूनची आतुरतेने वाट पहात आहेत.
भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून रविवारी निकोबार बेटांवर येऊन पोहोचला आहे. मान्सूनने रविवारी मालदीवचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, निकोबार द्वीप समूह आणि दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत मजल मारल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.
सध्याचे पोषक हवामान पाहता ३१ मेपर्यंत मान्सून केरळला, तर ६ ते १० जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
'ला नीना' च्या अनुकूल परिस्थितीमुळे यंदा देशात सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. गेल्या वर्षी 'अल निनो' सक्रिय होता, तर यंदा तो संपुष्टात येत आहे. त्यामुळे तीन ते पाच आठवड्यांत 'ला निना'ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये ३१ मे, तसेच दक्षिण कोकणात ५ जून रोजी दाखल होईल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी मान्सून प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
मान्सूनचा प्रवास सुरू झाला असून, तो सुरळीतपणे पुढे सरकेल. त्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. बंगालच्या उपसागरात २२ मे पासून कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि मान्सूनला ते पोषक ठरेल. तसेच याकाळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे असे डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ यांनी सांगितले.