भाजपा आणि महायुतीची मागणी : प्रतिमेला जोडे मारुन केला निषेध
सोलापूर (प्रतिनिधी) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून यांचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांना तत्काळ अटक करावी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा आणि महायुतीतर्फे करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, जितेंद्र आव्हाडांवर कारवाई झालीच पाहिजे, आदी घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या.
माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, ज्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील दबलेल्या, पिचलेल्या, उपेक्षितांना न्याय, अधिकार मिळवून दिले त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडण्याचे कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांना तत्काळ अटक करून कारवाई करावी.
भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी वेळोवेळी महापुरुषांचा अपमान केला आहे. जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, मल्हारराव होळकर, यांच्यानंतर आता त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे. अशी वक्तव्ये करून आपण काहीतरी वेगळे आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या मानसिकतेला आळा घालण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा असे कृत्य केले तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वीही त्यांनी असे प्रकार सातत्याने केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी.
याप्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ. किरण देशमुख, भाजपा शहर उत्तर विधानसभा प्रमुख राजकुमार पाटील, माजी सभागृह नेते संजय कोळी, भाजपा सरचिटणीस विशाल गायकवाड, रोहिणी तडवळकर, रुद्रेश बोरामणी, राजू माने, मारेप्पा कंपली, जय साळुंखे, बजरंग कुलकर्णी, महेश बनसोडे, प्रवीण कांबळे, श्रीनिवास करली, श्रीनिवास पुरुड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, आनंद चंदनशिवे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, नगरसेवक गणेश पुजारी, हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, बसवराज बगले, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.