परांडा येथे राज्यस्तरीय ब्राह्मण वधु-वर मेळावा

0
ब्राह्मण समाजातील मान्यवरांनी शाखा भेद विसरून लग्न जमवण्याचे काम करावे
          परांडा जि. धाराशिव (प्रतिनिधी) - ब्राह्मण समाजातील सर्वांनी शाखा भेद विसरून होतकरू तरुण-तरुणीच्या अविवाहित मुले-मुलींच्या लग्नासाठी प्रयत्न करावे; समाजातील प्रत्येकाने आंतरजातीय विवाहाऐवजी अंतरशाखीय विवाहाला प्राधान्य द्यावे, यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंढरपूर वधू-वर सूचक मंडळाचे प्रमुख हेमंत कुलकर्णी यांनी राज्यस्तरीय मेळाव्या प्रसंगी केले.
            परांडा येथील ब्रह्म वार्ता वधू-वर सूचक मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन परांडा येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष हेमंत कुलकर्णी व मिलिंद देवल यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
        या मेळाव्यात मार्गदर्शन करताना हेमंत कुलकर्णी यांनी सांगितले- समाजातील होतकरू तरुण-तरुणी अविवाहित मुला-मुलींसाठी स्वशाखीयातील लग्न जमवण्यासाठी प्रयत्न करावा; काही वधू वर सूचक मंडळे ही प्रामाणिकपणे लग्न जमविण्याचे काम करत आहेत, अशाच पद्धतीने ब्राह्मण समाजातील वधू-वर सूचक मंडळांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त अविवाहित मुलांची लग्न जुळविण्यासाठी प्रयत्न करावेत. हे करत असताना मुलगा होतकरू सुस्थितीत आहे का हे पाहणे, हे पाहत असताना तो कोणत्या शाखेचा आहे हे पाहू नये असे त्यांनी सांगितले.
        या राज्यस्तरीय वधू वर मेळाव्यासाठी सोलापूर, औरंगाबाद, केज, धारूर, परभणी, लातूर, नांदेड, परंडा परिसरातील व इतर जिल्ह्यातील ब्राह्मण समाजातील होतकरू इच्छूक अविवाहित व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी या मेळाव्याची माहिती परांडा येथील जयेश विद्वत यांनी विशद केली व राज्यस्तरीय ब्राह्मण वधू-वर मेळाव्या बाबत प्रास्ताविकात अनेक बाबी नमूद केल्या. यावेळी पंढरपूर येथील मिलिंद देवल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
          हा वधू वर सूचक मेळावा यशस्वी करण्यासाठी जयेश पत्की, मधुकरराव कुलकर्णी, जयेश विद्वत, सौ. प्रज्ञा कुलकर्णी, जयंत पत्की यांचे सह परांडातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी आभार जयेश विद्वत यांनी मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)