मंगळवेढा (प्रतिनिधी) - वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मोठा फटका बसून अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांचे तसेच अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी राहत्या घरांचे छत व पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त पिकांचे व घरांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी अशा सूचना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दोन्ही तालुक्यातील तहसीलदार, कृषी अधिकारी, महावितरण उपभियंता व इतर प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी यांना दिल्या आहेत.
दुष्काळजन्य परिस्थितीला तोंड देत असलेल्या मतदारसंघातील अनेक गावांना गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा व वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे केळी, डाळिंब, आंबा आदी फळबागांचे व शेतकऱ्यांच्या घराचे, लाईट पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच अनेक शेतकरी आपली पिके जगवण्यासाठी संघर्ष करत होते. मात्र, काल व त्याअगोदर काही दिवसांपूर्वी मतदारसंघातील अनेक गावात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नामोहरम केले असून शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.
तसेच अनेकांचे राहते घर कोसळून हक्काचा निवाराही निसर्गाने हिरावून घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांनी विविध नुकसानग्रस्त गावातील घरांना भेटी देऊन आढावा घेतला होता.
दरम्यान मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी या सर्व नुकसानग्रस्त बाबींचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी त्वरित पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करून त्याचे अहवाल नुकसानग्रस्त भरपाईसाठी शासन दरबारी सादर करावेत अशा सूचनाही आमदार आवताडे यांनी दिल्या आहेत.