पंढरपूर (प्रतिनिधी)- गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी प्रा. विजय नकाते यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे प्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी आपल्या भाषणातून राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. आपल्या भाषणात ते म्हणाले की, ‘सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षणाचे जनक, रयतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी केलेले शाहू महाराजांनी केलेले दिव्य कार्य, कोल्हापुर संस्थानात राधानगरी सारखे धरण बांधून सिंचनाची केलेली व्यवस्था, कलारसिक-कलाकार, कुस्तीगीर व खेळाडू यांना त्यांनी दिलेला राजाश्रय, उद्योगधंद्यांना केलेले सहाय्य, जातिनिर्मूलनाची चळवळ, वसतिगृह आणि शिक्षणसंस्थांची उभारणी अशा अनेकविध कार्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची लोकराजा अशी ओळख निर्माण झाली. ब्रिटीश राजसत्तेचा अंमल असताना सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व सर्व समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी आपले जीवन वेचणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात शेतकरी व प्रजेच्या हितासाठी मोलाचे कार्य केले. त्यांच्या या योगदानामुळे प्रत्येक ठिकाणी सामाजिक जाणिवेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते'.
यावेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना मान्यवरांकडून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, उपप्राचार्य डॉ.मिनाक्षी पवार, एसव्हीआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पाटील, सर्व अधिष्ठाता, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. करण पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा. ए.ए.मोटे, प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, सर्व विभागप्रमुख यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.