त्र्यंबकेश्वर जि. नाशिक (प्रतिनिधी) - दर वर्षाप्रमाणे यंदाही श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी चांदीच्या रथातून आषाढी वारीसाठी गुरुवारी दि. २० रोजी दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दुपारी दोनला समाधी मंदिरापासून सवाद्य मिरवणुकीने प्रथम कुशावर्त तीर्थावर स्नान व पूजाविधी झाल्यानंतर तेथून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून मार्गस्थ होणार आहे.
यासाठी निवृत्तिनाथ समाधी मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, या पालखी सोहळ्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत.
संत श्रीनिवृत्तिनाथ महाराज वारकरी भजनी मंडळातर्फे दर वर्षी पालखीसमवेत असलेल्या दिंड्या व भाविकांची व्यवस्था केली जात आहे.
शासनातर्फे निर्मलवारीसाठी सव्वादोन कोटींची मंजुरी मिळून जिल्हा परिषदेकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. या निधीतून पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, फिरती प्रसाधनगृहे व दिंडी मार्गातील मुक्काम व्यवस्था यासाठी ही रक्कम खर्ची पडणार आहे. एकूणच वारी सर्वदृष्ट्या सुविधेसह हायटेक होत असल्याचे चित्र दिसत आहे.
पालखीसमवेत दिंड्या व भजन, कीर्तन करणारे दिंडीप्रमुख, भालदार व चोपदार, भाविक भक्त असतात. त्यांची व्यवस्था पालखी व्यवस्था पाहणारे करतात. पालखी त्र्यंबकेश्वर येथून निघून सातपूर, पिंपळगाव बसवंत, नाशिक, काजीपुरा, गणेशवाडी, नाशिक रोड, खंबाळे, पारेगाव, गोगलगाय, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगराळ, अहमदनगर येथे ३ जुलैला निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा सकाळी दहा ते बारापर्यंत होईल. तेथून साकत, घोगरगाव, मिरजगाव, कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंबर, दगडीअकोले, करकंब, पांढरीचीवाडी, चिंचोली असा मुक्काम करीत पालखी सोहळा पंढरपूरला पोचणार आहे.
यात २५ जूनला सिन्नरलगतच्या दातली येथे व १६ जुलैला वाखरी येथे रिंगण सोहळा होईल. १७ ते २० जुलैला पंढरपूरला पालखीचा मुक्काम श्रीसंत निवृत्तीनाथ मठ, प्रदक्षिणा रोड, पंढरपूर येथे राहील.