पंढरपूर (प्रतिनिधी) - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या आचरणातून सामाजिक क्रांतीची सुरुवात केली, म्हणूनच त्यांच्या कार्याचा आदर्श आजही घेतला जात आहे ,असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी केले. पंढरपूर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती व इ.१० वी मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक अभय आराध्ये, पर्यवेक्षक अभय थिटे व सर्व शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी दीपक इरकल यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक कार्याविषयी विविध कथा व प्रसंगांच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते इ.१० वी मधील गुणवंत विद्यार्थी कु .साक्षी कवडे, कु . प्रियांका बुधतराव, कु. तनुजा रणदिवे व गणेश कोळी यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अभय आराध्ये यांनी केले, सूत्रसंचालन सुनिता लालबोंद्रे यांनी केले तर सांस्कृतिक विभागप्रमुख दीपक इरकल यांनी आभार मानले.