प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सोयी सुविधा बद्दल समाधान व्यक्त केले, परंतु स्वच्छतेसाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचे निर्देश
सोलापूर, दिनांक 14 (जिमाका) :- आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात. या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारी कालावधीत प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, सार्वजनीक बांधकाम मंत्री (सार्वजनीक उपक्रम ) दादा भुसे, आमदार समाधान आवताडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, नगरविकाचे उपसचिव तथा समन्वयक अनिरुद्ध जवळेकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी प्रशांत जाधव तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
येत्या 17 जुलै रोजी आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समिती व प्रशासनाच्या वतीने दर्शन रांगेत देण्यात येणाऱ्या मॅट, स्वच्छ पेयजल, आरोग्य, शौचालये आदि सुविधा तसेच, महिला भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच चंद्रभागा नदीपात्रात स्नान केल्यानंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चेंजिंग रूमची पाहणी व शौचालयाची देखील पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली.
यावर्षीची आषाढी वारी अतिशय नियोजनबद्ध झाली पाहिजे, वारकरी सांप्रदायाची कुठल्याही प्रकारची गैरसोय, अडचण होता कामा नये, दर्शन रांगेमध्ये भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून मंदीर समितीमार्फत पत्राशेड, दर्शन रांगेत देण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती मंदीर समितीचे सह.अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी - सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.
वारकऱ्यांशी साधला संवाद
मुख्यमंत्र्यी श्री. शिंदे यांनी पत्रा शेड येथील दर्शन रांगेत वारकरी भक्तांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. वारकऱ्यांनी मंदिर समिती व जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले, पंढरपुरात वारकरी भक्तांना चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत हे पाहून समाधान वाटत आहे. वारकरी संपूर्णपणे खुश आहेत, असे ते म्हणाले.
65 एकर येथील अतिदक्षता विभागातील रुग्णांशी संवाद-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 65 एकर येथे प्रशासनाच्या वतीने वारकरी भाविकांसाठी उभा करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागातील रुग्णांशी अत्यंत आस्तेवाईकपणे चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच येथे योग्य प्रकारे आरोग्य सुविधा व उपचार मिळत आहेत का याची माहिती जाणून घेतली.
बुलेट वर बसून सुविधांची पाहणी-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 65 एकर येथून आमदार समाधान आवताडे यांच्या समवेत बुलेटवर बसून चंद्रभागा वाळवंट व पत्राशेड येथील दर्शन रांगेची पाहणी केली. दर्शन रांगेतील भाविकांशी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती जाणून घेतली.
मुख्यमंत्री श्रीसंत निळोबाराय पालखी समवेत पायी चालले-
पालखी मार्गावरून पंढरपूरकडे येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करकंब येथे श्री संत निळोबाराय पालखीचे पूजन करून दर्शन घेतले. तसेच पालखीतील वारकऱ्यासोबत किमान आठ ते दहा किलोमीटरचे अंतर पायी चालले. यावेळी टाळ गळ्यात घालून मुख्यमंत्री महोदय पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झाले.