दिंडी सोहळा म्हणजे आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली - डॉ मंठाळकर

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जलसंवर्धन दिंडीचा समारोप

        पंढरपूर (प्रतिनिधी) - संतांचा दिंडी पालखी सोहळा म्हणजे आनंदी जीवनाची गुरुकिल्ली होय. या सोहळ्यातुन मानवी मनाला जगण्याची नवी उर्जा मिळते असे मत सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या बागेश्री मंठाळकर यांनी व्यक्त केले . 
           सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे आयोजित पुणे ते पंढरपूर दिंडी ची २० वर्षाची अखंड परंपरा सुरु आहे. सन २००४-०५ या शैक्षणिक वर्षापासून सुरु असलेली दिंडी सेवाभावाचा आनंद रुजवणारी आहे. या दिंडीचे महात्म्य महाराष्ट्र आणि देशभरातून सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या मनातही रुजले आहे. महाराष्ट्र शासन, स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, वैद्यकीय सेवा यांच्या करीता ही राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या दिंडीतील उपस्थिती अधिक आश्वासक आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छ वारी - स्वस्थ वारी - निर्मल वारी -  हरित वारी या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय 'जलसंवर्धन दिंडीचे' आयोजन दिनांक २९ जून ते १९ जुलै, २०२४ दरम्यान 'श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज' पालखी मार्गावर करण्यात आले होते. 

           या दिंडीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सह महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे १५० स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच यावर्षीच्या दिंडीमध्ये जलसंवर्धन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचे महत्व समाजामध्ये रुजविणे, पर्यावरणाचा समतोल साधणे, व्यसनमुक्ती अभियान, याबाबत प्रबोधन पुरक जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेला स्वयंसेवकाच्या सहभागातून आळंदी ते पंढरपूर दिंडी मार्गावरील गावांचे सामाजिक सर्वेक्षण, स्वच्छता मोहीम, वापरलेल्या पत्रावळ्या व निर्माल्य संकलन, उघड्यावर शौचालायास न बसता कृत्रिम शौचालयांच्या वापराबाबत वारकऱ्यांचे प्रबोधन करणे, पथनाट्य पथकांच्या माध्यमातून 'जलसंवर्धना' बाबत गावा गावांमध्ये जनजागृती करणे, सुदृढ लोकशाही साठी मतदान जनजागृतीसाठी लोकजागर, लोकसंख्या नियोजन, लोकसंख्या नियंत्रण आदि सामाजिक विषयांवर  पालखी मार्गावर सहभागी वारकरी व गावकऱ्यांमध्ये उदबोधन पुरक उपक्रम राबविण्यात आले. 
       सदर दिंडीचे संयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले आणि विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी केले होते . या दिंडीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाचे सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले . 

        पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात या दिंडीचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या बागेश्री मंठाळकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी, पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य सी जे खिलारे यांसह विद्यार्थी स्वयंसेवक व प्राध्यापक उपस्थित होते. 
            यावेळी बोलताना विद्यार्थी स्वयंसेवक म्हणाले की, या वारीने आम्हाला जे दिलं ते मागील वीस वर्षात मिळालं नव्हतं. विद्यार्थ्यांच्या मनातील ही भावना महत्त्वपूर्ण होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक तांबे यांनी केले तर आभार डॉ. सुनील मोहटे यांनी मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)