पंढरपूर (प्रतिनिधी) - यंदा विक्रमी भरलेल्या आषाढी यात्रेचे काटेकोरपणे नियोजन करणाऱ्या प्रशासनाचा पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पंढरीची आषाढी वारी ही वारकऱ्यांसाठी मोठी अध्यात्मिक पर्वणी असली तरी प्रशासनासाठी मात्र एक मोठे आव्हान असते. राज्यभरातून येणाऱ्या पालख्या, विविध राज्यातून येणारे लाखो भाविक हे एकाच वेळी पंढरपूर शहरात दाखल झाल्यामुळे प्रशासनावर मोठा ताण असतो. मात्र नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा ताण झुगारून प्रशासनातील सर्व विभागांना बरोबर घेऊन यावर्षी आषाढीचे उत्कृष्ट नियोजन केले. विशेष म्हणजे आशीर्वाद यांची पहिली आषाढी वारी असून देखील व यंदा विक्रमी वारकरी दाखल झाले असले तरी अपवाद वगळता नियोजनात फार त्रुटी आढळून आल्या नाहीत.
यानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्यासह प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगोटे, मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे आदींचा मंदिर समितीच्या नवीन भक्त निवास येथे वारकरी उपरणे घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार सुनील उंबरे यांनी माऊलीच्या रिंगणाचे काढलेले छायाचित्र देखील त्यांना भेट म्हणून देण्यात आले.