स्वेरीत पहिला मासिक योग दिन उत्साहात साजरा
पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘आनंददायी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी सर्वप्रथम चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवावे. कारण चेहऱ्यावरील प्रसन्नता ही खऱ्या अर्थाने यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे आपले कार्य अधिक क्षमतेने पुढे जात असते. आपण योग करताना व प्राणायाम करताना नेहमी प्रसन्न मनाने आणि डोळे बंद करून प्राणायाम केला पाहिजे. योग व प्राणायाम केल्याने आपल्याला शारीरिक व मानसिक ऊर्जा मिळते तसेच शरीर हलके आणि मन देखील शांत होते.’ असे प्रतिपादन योग प्रशिक्षिका, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनुयायी व मार्गदर्शक साध्वी तत्वमयी यांनी केले.
‘जागतिक योग दिन’ हा प्रत्येक वर्षी दि.२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थात जगभरात साजरा केला जातो. गेल्या २१ जून रोजी स्वेरीत देखील ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी यापुढे ‘स्वेरीअंतर्गत असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला सामुहिक ‘योग दिन’ साजरा करण्याचे घोषित केले होते. यावेळी दि.२१ जुलै हा रविवार, गोपाळपूरमध्ये गोपाळकाला आणि गुरु पोर्णिमा असा तिहेरी अडथळा होता तरीही घोषित केल्याप्रमाणे दि. २१ जुलै रोजी स्वेरीमध्ये पहिला मासिक ‘योग दिन’ साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या उपक्रमाला वस्तीगृहातील सर्वच विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रतिसाद दिला.
यावेळी मार्गदर्शक साध्वी तत्वमयी पुढे म्हणाल्या की, ‘विनम्रता जीवनात आली की ज्ञान लाभते आणि हे सर्व नियमितच्या योगामुळे घडते. त्यामुळे आपण करत असलेल्या योगामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि एकूणच गुरुतत्त्वामुळे सर्व ज्ञान सुरक्षित राहते.’ असे सांगितले.
यावेळी उपस्थित विद्यार्थी- विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून रामधन, भस्रिका, शरीराच्या अवयवांचे, श्वासाचे व्यायाम करवून घेण्यात आले त्यामुळे विद्यार्थी व सर्वजण अधिक उत्साहित दिसत होते. आता प्रत्येक महिन्याच्या दि.२१ तारखेला नियमितपणे स्वेरीच्या भव्य मैदानावर ‘योग दिन’ साजरा केला जाणार आहे. सदरचा कार्यक्रम स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वेरीचा क्रीडा विभाग तसेच अभियांत्रिकी व फार्मसीचे ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभाग, ‘कमवा व शिका’ योजनेमधील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून उपस्थित सर्वांचे आभार मानले.