मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते चंद्रभागा बसस्थानक व यात्री निवास इमारतीचे लोकार्पण

0
          पंढरपूर, दि. १७: ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने पंढरपूर येथे उभारण्यात आलेले चंद्रभागा बसस्थानक व यात्री निवास इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. 
          यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक  शिवाजी जगताप, दिनेश महाजन, पुणे विभागाच्या उप महाव्यवस्थापक यामिनी जोशी, पंढरपूर विभाग नियंत्रक विनोद भालेराव आदी उपस्थित होते.
       श्री.महाजन यांनी चंद्रभागा बसस्थानक व यात्री निवास इमारतील सुविधांची पाहणी केली. 

चंद्रभागा बसस्थानक व यात्री निवास इमारत
             आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी एसटी महामंडळाकडून आपल्या ११ हेक्टर जागेवर ३४  फलाटाचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे. तसेच  पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविक- यात्रेकरूंच्या निवासाची अल्प दरात सोय व्हावी या दृष्टीने बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आले आहे. या यात्री निवासामध्ये ५०० एसटी कर्मचारी तसेच एकाच वेळी सुमारे १ हजार यात्रेकरुंची निवासाची सोय होणार आहे. एसटी कर्मचारी व यात्रेकरूंसाठी २ सुसज्ज उपहारगृहे देखील बांधण्यात आली आहेत.राज्यात एसटी महामंडळाचा हा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी एकूण ३३ कोटी रुपये खर्च आले आहेत. 

           या बसस्थानकात वाहतूक नियंत्रण कक्ष, आरक्षण कक्ष, पुरुष व महिला व दिव्यांगाकरीता स्वतंत्र विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष, आपला दवाखाना, जेनेरिक औषधालय, पार्सल कक्ष, पोलीस मदत केंद्र, वातानुकूलित प्रतीक्षालय, प्रशस्त वाहनतळ, दोन उद्वावाहक आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या बस स्थानकावरून  राज्यात सर्व ठिकाणी एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)