पंढरपूर (प्रतिनिधी) - सध्या राज्यापाल नियुक्त 12 जागेकरीता वरिष्ठ पातळीवर मोठया प्रमाणात हालचाली सुरु झालेल्या आहेत. पंढरपूरचे कल्याणराव काळे यांना पक्ष पातळीवर संधी मिळणेबाबत चर्चा चालु असतानाच त्यांचे समर्थक हे काल परवा चारही विधानसभा सदस्यांना प्रत्यक्ष भेटून आपण काळे यांची वरिष्ठांकडे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड होणेबाबत आमदार बबनदादा शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार यशवंत माने, आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार तथा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिपकआबा साळूंखे-पाटील यांनी शिफारस करावी यासाठी असंख्य कार्यकर्तेसह शिष्टमंडळ भेटीसाठी गेलेले होते.
कल्याणराव काळे हे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात गेली 20 ते 22 वर्षे कार्यरत असून कारखान्याच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आरोग्य, साहित्य कला क्रिडा व आर्थिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनिय कार्य चालू आहे. यापुर्वी विधान परिषद व विधानसभा निवडणुक लढविलेली आहे, त्यामुळे त्यांचा संपर्क दांडगा असून समाजातील सर्व घटकांपर्यंत त्यांची नाळ जोडलेली आहे. पंढरपूर तालुका हा चार विधानसभा मतदार संघामध्ये विभागला गेल्याने चारही लोकप्रतिनिधी त्या त्या मतदार संघातील आहेत. दक्षिणकाशी अशी ओळख असलेल्या तिर्थक्षेत्र पंढरपूर येथे देशभरातून दररोज हजारो तर वर्षभरात एक कोटीहून आधिक भाविक येत असतात. अशा ठिकाचे स्थानिकचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी स्थानिक भुमिपुत्र म्हणून लोकप्रतिनिधीची उणीव भासत असून त्यातुनच कल्याणराव काळे यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला या ठिकाणचा हक्काचा सदस्य विधान परिषदेत पाठवावा अशी सोलापूर जिल्हयातून कार्यकर्त्यांची मागणी आहे.
पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा, सांगोला, माढा व मोहोळ मतदार संघातील लोकप्रतिनिधी यांचे भेटीनंतर कल्याणराव काळे यांचेप्रती लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भुमिका घेत आम्ही लवकरच वरिष्ठ नेते मंडळींना शिफारस करु असे आश्वासन यावेळी देण्यात आले.