पंढरपूर (प्रतिनिधी) - भारतीय डाक विभागाच्या बँकिंग सेवा, इन्शुरन्स सेवा, अपघाती इन्शुरन्स सेवा, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सेवा आदी प्रकारच्या सेवा ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सरकारच्या डाक चौपाल उपक्रमांतर्गत पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक मा. चंद्रकांत भोर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डाक कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम नवी पेठ पोस्ट ऑफिस येथे आयोजित केला होता.
सदर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून केंद्रीय रेल्वे समितीचे संचालक, युवक नेते ॲड.प्रणव परिचारक साहेब उपस्थित होते. त्यांनी स्वतः इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे खाते उघडून, सदर खात्याचा उपयोग सर्व सामान्य नागरिकांनी करून सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थितांना केले.
आपल्या मनोगतामध्ये प्रणव परिचारक यांनी सांगितले की, डाक विभागाच्या वतीने मुख्यमंत्री बहीण लाडकी, लेक लाडकी या राज्य सरकारच्या तर आरोग्य विभागाच्या मातृ वंदना, जननी सुरक्षा योजना तसेच शेतकऱ्यांसाठी प्रधान मंत्री किसान सन्मान योजना अशा लोकाभिमुख योजना पोस्ट ऑफिस मध्ये राबविल्या जातात. तसेच सर्वाधिक व्याजदर देणार्या योजना पोस्ट ऑफिस मध्ये लोकांसाठी उपलब्ध आहेत तरी याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन केले.
मंगळवेढा उप विभागाच्या डाक निरीक्षक श्रीमती शेख मॅडम यांनी उपस्थित महिलांना, महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र योजना, मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना, मुलांसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सर्व प्रकारच्या बचतीचे व्यवहार करण्यासाठी पोस्ट ऑफिस बचत खाते आणि इंडिया पोस्ट पेमेंटचे डिजिटल बँकिंगचे खाते याबाबत माहिती सांगितली. मानवी जीवनामध्ये भविष्यात येणार्या आर्थिक संकटांवरती मात करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचे फायदे सांगून पोस्ट ऑफिसचा डाक विमा आणि ग्रामीण टपाल जीवन याबाबतही विवेचन आपल्या भाषणामधून केले.
या कार्यक्रमासाठी पंढरपूर डाक विभागाचे डाक अधीक्षक मा .चंद्रकांत भोर, मंगळवेढा डाक उपविभागाचे डाक निरीक्षक शेख मॅडम, पंढरपूर नवी पेठ पोस्ट ऑफिस पोस्टमास्तर श्रीमती मुजावर मॅडम उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. सचिन इमडे, श्री विष्णू कांदे, श्री.हरीश हाके, श्री.सोमनाथ कोरके, श्री.विजय हिवरे, श्री.वसीम मुजावर, श्री.आकाश पाटील, श्रीमती डांगे मॅडम आदींनी परिश्रम घेतले..