मंगळवेढा (प्रतिनिधी) - मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला मंगळवेढा उपसा योजनेला व मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या कामाला अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागणीत निधीची तरतूद झाली असून या योजनेचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच या योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मार्च महिन्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळाली होती मात्र या मंजुरीनंतर या अगोदर दोन वेळा मंजुरी मिळाली आहे, हे केवळ राजकारणासाठी लोकसभेच्या तोंडावर मंजुरी देऊन लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे अशा टीका विरोधकांनी केल्या मात्र मंजुरीनंतर दुसऱ्याच दिवशी टेंडर पब्लिश झाल्यामुळे विरोधकांना चपराक बसली होती त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीमध्ये या योजनेसाठी निधीची तरतूद झाली असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे काही दिवसात या योजनेचे काम सुरू होणार असल्याने येथील जनतेला राजकारण्यांनी वर्षानुवर्षे खेळवत ठेवलेला प्रश्न मार्गी लागण्याचा विश्वास दुष्काळी भागातील जनतेला वाटू लागला आहे .
पोट निवडणुकीमध्ये पंढरपूर मतदारसंघांमधून समाधान आवताडे यांना निवडून द्या महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून मी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी देतो असा शब्द तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील सभेत मंगळवेढेकरांना दिला होता. त्या शब्दावर विश्वास ठेवून मंगळवेढेकरांनी समाधान आवताडे यांना आमदार केले. त्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी सरकारचा करेक्ट कार्यक्रम ही केला आणि आवताडे यांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पाठपुराव्याची दखल घेत १३ मार्च २०२४ च्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६९७.५१ कोटीच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस विना अट मंजुरी दिली. मंगळवेढेकरांना दिलेला शब्द फडणवीस सरकारने पूर्ण केल्याने मंगळवेढा तालुक्यातून फटाके फोडून व पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तर विरोधकांकडून या अगोदरही अशी मंजुरी मिळाली होती यात नवीन काय? असं म्हणत या मंजुरीची खिल्ली उडवली जात होती मात्र दुसऱ्याच दिवशी या कामाचे पहिल्या टप्प्यातील 111 कोटीची निविदा पब्लिश करण्यात आली होती. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाच्या पुरवणी मागणीमध्ये या योजनेच्या निधीसाठी तरतूद करण्यात आली असून दोन्हीही कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असून ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले.