आषाढी वारी सोहळ्यात भाविकांची वाढती संख्या विचारात घेवून सुविधा द्याव्यात - पालकमंत्री

0
             पंढरपूर दि. 06:-  आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी  मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात तसेच  दिवसेंदिवस पायी पालखीसोहळ्या सोबत येणाऱ्या  वारकरी भाविकांची संख्याही वाढत आहे.आषाढी सोहळ्यासाठी भाविकांची वाढती संख्या विचारात घेवून आवश्यक सर्व दर्जेदार पायाभूत सुविधा पुरवाव्यात त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी  अशा सूचना  उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
         आषाढी वारी नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस खासदार प्रणिती शिंदे,आमदार  समाधान आवताडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधिक्षक  शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर,सा.बां.कार्यकारी अभियंता संजय माळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,जिल्हा नियोजन अधिकारी अनिल पवार, उत्पादन शुल्कचे अधिक्षक नितीन धार्मिक, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी वि.ना पवार, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच पालखी सोहळा प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते. 
          यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात    पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, आरोग्य सुविधांची उपलब्धता करावी. पालखी सोहळ्यांना पालखी मार्गाबरोबरच पालखी तळावर कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी वारकऱ्यांसाठी सर्व सुविधांची कामे पूर्ण करावीत. अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या.तसेच  बैठकीत मान्यवरांनी केलेल्या सूचनांनुसार आवश्यक त्या सर्व पूरक व्यवस्था उपलब्ध करून द्याव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       यावेळी  जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद म्हणाले, पालखी सोहळे जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर सर्व भाविकांना , पालखी मार्ग व तळांवर आवश्यक सुविधा देण्याबाबत प्रशासन सज्ज असून आषाढी यात्रा सोहळ्यात भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या दिड्यांना जादा पाण्याचे टँकर, फिरती शौचालय, सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता आदी व्यवस्थाउपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले 
      चांगावटेश्वर महाराज मठा समोर रथ लावण्याची व्यवस्था व्हावी. श्री मुक्ताबाई पालखी व श्री संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या दिंड्यांना सुरक्षा व्यवस्था व मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी. पंढरपूर शहरात मठांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना आपल्या मठात जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात याबाबत पोलीस प्रशासाकडून सहकार्य मिळावे अशी मागणी यावेळी पालखी सोहळा प्रतिनिधी व  वारकरी- भाविकांनी केली 
       खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या पंढरपूर अतिक्रमणे काढताना संबंधितांना नोटीस देऊन काढावीत तसेच त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे यावेळी सांगितले
             आमदार समाधान आवताडे म्हणाले आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अतिक्रमण मोहीम सुरू असून, अतिक्रमणे काढताना संबंधितांना नोटीस देऊन अतिक्रमणे काढावीत जेणेकरून संबंधितांचे नुकसान होणार नाही. याची दक्षता घ्यावी असे यावेळी त्यांनी सांगितले.
               तत्पुर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्राशेड येथील दर्शनरांगेला भेट देवून वारकरी भाविकांसाठी मंदीर समितीकडून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधाबाबत माहिती घेतली व आवश्यक सूचना दिल्या. तसेच दर्शन रांगेतील भाविकांशी यावेळी त्यांनी संवाद साधला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)