महामार्ग पोलिस पाकणी यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यदिनी 170 जणांचे रक्तदान

0
        सोलापूर (प्रतिनिधी) - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे 
येथे भव्य रक्तदान शिबीर पार पडले. पाकणी येथील महामार्ग सुरक्षा पोलिस यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल 170 रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला. या पार्श्वभूमीवर सोलापूर ब्लड बँक सोलापूर यांनी महामार्ग पोलीस अधिकारी एपीआय आनंद थिटे आणि त्यांच्या स्टाफचे आभार मानले आहेत. 

          रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान समजले जाते. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाचे जाळे पसरले असून अनेकवेळा अपघाताचे प्रसंग घडतात. काहीवेळा रुग्णांना रक्ताची गरज भासते. त्यामुळे रक्तदानाचे  महत्व नागरिकांना समजावे या हेतूने सोलापूर जिल्ह्यातील पाकणी येथील महामार्ग सुरक्षा पोलीस पथकाचे वरिष्ठ अधिकारी एपीआय आनंद थिटे यांनी तिऱ्हे येथे रक्तदान शिबिराचे यशस्वीपणे आयोजन केले होते.
        स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या शिबिराचे उद्घाटन तिऱ्हे गावचे सरपंच गोवर्धन जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारत जाधव, रामकाका जाधव, बाळासाहेब सुरवसे, तंटामुक्ती अध्यक्ष अरविंद जाधव, भास्कर  सुरवसे, गुरुदेव गायकवाड, अजय सोनटक्के यांच्यासह सिद्धिविनायक गणेश मंडळाचे अध्यक्ष महेश आसबे, आप्पासाहेब कुलकर्णी, योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
           या रक्तदान शिबिर प्रसंगी बोलताना एपीआय आनंद थिटे म्हणाले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून गरजू व्यक्तींना त्याचा उपयोग व्हावा, नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व समजावे या हेतूने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. भविष्यात कोणत्याही व्यक्तीला रक्ताची गरज भासू शकते. अशावेळी आपण दान केलेले रक्त त्या रुग्णाच्या उपयोगी येते. तसेच एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो.  हाच उदात्त हेतू ठेवून आज हा सामाजिक उपक्रम राबवला असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
        या रक्तदान शिबिरासाठी कुंभारी, शिवणी, ति-हे, पाथरी गावातून रक्तदाते रक्तदान करण्यासाठी सहभागी झाले होते. तसेच महामार्ग सुरक्षा  पोलीस पथकाचे कर्मचारी अधिकारी यांच्यासह, सिद्धीविनायक प्रतिष्ठान मंडळाचे कार्यकर्ते यांनी देखील उस्फुर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले.  

              या शिबिरासाठी एपीआय आनंद थिटे यांच्या मार्गदर्शनात सोलापूर ब्लड बँक यांच्या माध्यमातुन सिद्धीविनायक प्रतिष्ठानचे विनोद शिंदे, उमेश कुंभार, गोविंद सुरवसे, अनिल शिंदे, इरफान पठाण, सैफन शेख, गोपाळ सुरवसे, रमेश इरर्शेट्टी, सलीम शेख, शंकर घनदुरे, विशाल इरशेट्टी आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)