स्वेरीत प्रथम वर्ष इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन सत्र संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘स्वामी विवेकानंदांचे विचार हे तरुणांसाठी नित्य मार्गदर्शक आहेत. राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रविकासाचे विचार स्वामीजींनी युवकांमध्ये रुजवले. त्यांचे विचार काळाच्या पुढे धावणारे होते. बलदंड शरीर आणि मजबूत मनाच्या तरुणांकडून बलशाली भारताची निर्मिती होऊ शकते यावर स्वामीजींचा प्रगाढ विश्वास होता. विश्वबंधुत्वाच्या परंपरेतील विचारांना सर्वार्थाने स्वामी विवेकानंदांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ दिले. समाजातल्या रूढी, परंपरांच्या व कर्मकाडांच्या जोखडातून तरुणांना मुक्त करणारे विचार विवेकानंदांनी समाजासमोर मांडले.’ असे प्रतिपादन रामकृष्ण मठाचे दिपक केसकर यांनी केले.
स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) मधील प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना रामकृष्ण मठाचे दिपक केसकर हे मार्गदर्शन करत होते. सर्वप्रथम स्वेरीच्या प्रथम वर्षातील डॉ. हरीदास पवार व डॉ. रंगनाथ हरीदास यांनी केसकर यांचे स्वागत केले. पुढे मार्गदर्शनात केसकर म्हणाले की, ‘तरुण वयात ज्ञान साधना करणे हे युवकांचे आद्य कर्तव्य आहे. या ज्ञानाच्या जोरावर जग पादाक्रांत करता येते. यामध्ये राष्ट्रसाधना आणि राष्ट्रविचार हा तितकाच महत्वाचा आहे. तरुणांच्या जडणघडणीत गुरूंचा मोठा वाटा असतो. तसाच विवेकानंदांच्या जडणघडणीत रामकृष्ण परमहंसांची भूमिका महत्वाची होती. आई-वडीलांना योग्य सन्मान देणे ही आपली परंपरा आहे. संस्कृती आणि परंपरेचा सन्मान राखून योग्य दिशेने मार्गक्रमण करणे हे युवकांसाठी गरजेचे ठरते. यात स्वामी विवेकानंदांनी मांडलेले विचार तरुणांनी अभ्यासले पाहिजेत. स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांना निश्चितपणे भारावून टाकतात.’ असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
हा कार्यक्रम स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर व विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग यांच्या सहकार्याने संपन्न झाला.