पंचायत समिती स्तरावरील तक्रार निवारण दिन सुरू करावा- ग्राहक पंचायतीची मागणी

0
           पंढरपूर (प्रतिनिधी)-  सोलापूर जिल्ह्यात पंचायत समिती स्तरावरील तक्रार निवारण दिन सुरू करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. 
           ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना अनेक समस्यांना, अडचणींना तोंड द्यावे लागते.त्या ठिकाणी न सुटणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक पंचायत समितीस्तरावर व्हावी, तक्रार निवारण व्हावे म्हणून शासनाने तशी यंत्रणा निर्माण केलेली आहे. ग्रामीण विकास विभागाने परिपत्रक क्र. मविसे १०२०/प्रक्र ४१/२०२०आस्था-३दि. ३ मार्च २०२० अन्वये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी गटविकास अधिकारी यांनी पंचायत समितीस्तरावर सभेचे आयोजन करण्यात यावे व तक्रारींचे निवारण करण्यात यावे असे आदेश दिलेले आहेत. तथापि याची अंमलबजावणी जिल्ह्यात कोठेही होत असल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे नागरिकांना थेट जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. ही बाब लक्षात आल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केला. त्यानुसार पंचायत समिती स्तरावरील तक्रार निवारण दिन घ्यावा असे आदेश त्यांनी दिलेले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी गांभीर्याने होईल अशी अपेक्षा प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते, महिला विभाग प्रमुख सौ.माधुरी परदेशी सदस्य अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर, तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, संघटक महेश भोसले, सचिव धनंजय पंधे यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)