श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित - कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
ऑनलाइन पद्धतीने पूजेची होणार नोंदणी
पंढरपूर (प्रतिनिधी) - श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी पूजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजा नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली असून लवकरच ऑनलाईन पद्धतीने पूजेची नोंदणी सुरू करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
याबाबत मंदिर समितीच्या दि. 20 ऑगस्ट रोजीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखालील सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून, भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. भाविकांना अल्प देणगी मूल्य आकारून विविध प्रकारच्या पूजा उपलब्ध करून देण्यात येतात. तथापि, सदर पूजांचे बुकिंग ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत भाविकांकडून मागणी होत होती.
याबाबतची संगणक प्रणाली विकसित झाली असून, याबाबत चाचणी घेण्याचे काम सुरू आहे. येत्या पंधरा दिवसात काम पूर्ण होऊन दि. 01 ऑक्टोबर 2024 पासून बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना घर बसल्या ऑनलाइन पद्धतीने पूजा नोंद करता येईल असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले