मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची चित्रफीत पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शित

0
         मंगळवेढा (प्रतिनिधी) - मंगळवेढा तालुक्यातील ऐतिहासिक मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असून या योजनेच्या माहितीची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सोलापूर येथे प्रदर्शित करण्यात आली. यावेळी आमदार समाधान आवताडे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अधीक्षक अभियंता बगाडे, कार्यकारी अभियंता नारायण जोशी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर अंकुश पडवळे पांडुरंग चौगुले यांचेसह  24 गावातील पदाधिकारी उपस्थित होते.

            मंगळवेढा तालुक्यातील 24 गावच्या उपसा सिंचन योजनेच्या कामाला मंजुरी मिळवण्याचा ऐतिहासिक निर्णय समाधान आवताडे यांनी पाठपुरावा करून घेतला असून त्यांच्या या प्रयत्नामुळे तालुक्यातील शेतकरी शेतात लवकरच पाणी पाहणार आहेत, लवकरच या योजनेचे भूमिपूजन करण्यात येणार असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल असे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. ही चित्रफीत प्रदर्शित करताना यामध्ये योजनेची पूर्ण माहिती दर्शविण्यात आली आहे या योजनेचा एकूण खर्च 697 कोटी 71 लाख रुपये येणार असून 17,187 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. तीन पंपग्रहाद्वारे पाणी उचलण्यात येणार असून पहिला टप्पा गुंजेगाव, दुसरा टप्पा लक्ष्मी दहिवडी व तिसरा टप्पा गोणेवाडी असे तीन ठिकाणाहून प्रत्येकी चार पंपाद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये लक्ष्मी दहिवडी, शेलेवाडी व आंधळगाव येथील निम्मा परिसर ओलिताखाली येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित आंधळगाव, लेंडवे चिंचाळे, खुपसंगी, गोणेवाडी या गावांना पाण्याचा लाभ मिळणार आहे तर तिसऱ्या टप्प्यांमध्ये जुनोनी, पाटकळ, खडकी, मेटकरवाडी, नंदेश्वर, रड्डे, भोसे, सिद्धनकेरी, निंबोणी, जित्ती, खवे, तळसंगी, यड्राव, भाळवणी, जालिहाल, हाजापूर, हिवरगाव, डोंगरगाव या गावांना तिसऱ्या टप्प्यामधून नलिका निहाय क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
          या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम यामध्ये पोहोच कालवा, पंपगृह, कळ यंत्र, नलिका व शेलेवाडी येथील गुरुत्वीय नलिका व त्यावरील वितरण व्यवस्था कामाची निविदा काढण्यास शासनाची मान्यता मिळाली असून पहिल्या टप्प्यातील सर्व तांत्रिक मान्यता घेऊन कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या पहिल्या टप्पा क्रमांक एक अंतर्गत शेलेवाडी गुरुत्वीय नलिका द्वारे 2068.79 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तर उर्वरित टप्पा क्रमांक दोन व तीनच्या निविदा काढण्याची परवानगीचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात आला आहे. त्याला लवकरच तांत्रिक मान्यता मिळवून टप्पा दोन व तीनची निविदाही तात्काळ काढून सर्व काम एकाच वेळी सुरू करणार असल्याचे यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. यावेळी मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांमधील पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. यामध्ये सभापती प्रदीप खांडेकर, खुपसंगी येथील जयराम आलदर, नंदेश्वर येथील अशोक चौंडे, भारत गरंडे, आंधळगाव येथील सुरेश भाकरे, येड्रावचे चंद्रकांत गोडसे, लक्ष्मी दहिवडी येथील धनंजय पाटील यांचेसह भाजपचे जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण तालुका अध्यक्ष अंबादास कुलकर्णी, युवक जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव राजू पाटील, संजय पाटील, गावचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

********************************
       या योजनेसाठी  आम्ही खूप पाठपुरावा केला मतदानावर बहिष्कार टाकला गावे बंद केली दिवंगत आमदार भारत नाना भालके यांनी यामध्ये लक्ष घालून योजनेची पायाभरणी केली होती मात्र त्यांचा जाण्याने पुन्हा आम्ही खचलो होतो. मात्र आमदार समाधान आवताडे यांनी प्रयत्न करून या योजनेची प्रत्यक्षात मुहूर्तमेढ रोवली व मृगजळ वाटणारी योजना प्रत्यक्षात भूमिपूजनापर्यंत आणली आहे लवकरच आमच्या शेतात पाणी दिसेल असं आता वाटू लागला आहे 

- पांडुरंग चौगुले शेतकरी भाळवणी

--------------------------------------------------
          ही उपसा सिंचन योजना व्हावी यासाठी अनेक आंदोलने झाली येथील गावांनी आम्हाला कर्नाटकात जोडा अशीही मागणी केली जनरेटा व लोकप्रतिनिधींची ताकत यामुळे ही योजना लवकरच पूर्णत्वास जाईल अशी आशा आहे ही योजना मंजूर झाल्याने ओसाड पडलेल्या माळरानावर शेतकऱ्यांना लवकरच हिरवळ पहावयास मिळेल.

- अंकुश पडवळे कृषिभूषण शेतकरी
--------------------------------------------------

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)