आ. समाधान आवताडे यांचेकडून प्रशासकीय बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
पंढरपूर (प्रतिनिधी) - उजनी आणि वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. वरील धरणातून उजनीकडे येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठा आहे. पावसाच्या पाण्यामुळे पाणी अधिक वाढत आहे. यामुळे भीमा नदीला पूर येण्याची शक्यता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील प्रशासनाने पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहावे. अशा सूचना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनाला दिल्या आहे.
उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे.यासाठी पंढरपूर येथील प्रांत कार्यालय येथे आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी प्रशासनाची बैठक घेण्यात आली. यावेळी वरील सूचना देण्यात आल्या आहेत.
सदरच्या बैठकीसाठी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे, उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आ.समाधान अवताडे यांनी प्रशासनाला उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे भीमा नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पंढरपूर शहर आणि नदीकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर करावे लागणार आहे. याच नागरिकांना इतर सुविधा देण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
सन 2019 मध्ये आलेल्या पुरामध्ये भीमा नदीत तीन लाख क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होता. यामुळेच मोठा पूर आला होता. सध्या मात्र भीमा नदीत एक लाख वीस हजार ते एक लाख 40 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे. यामुळे मागील वेळी पेक्षा सध्यातरी मोठा धोका वाटत नाही. मात्र यापुढील पावसाची परिस्थिती आणि वाढत असलेले पाणी, यामुळे धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यास पुराचा धोका वाढून मोठी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळेच आतापासूनच या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.