इतिहासात प्रथमच शासकीयस्तरावर संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा
पंढरपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते शुक्रवार दि. २ ऑगष्ट रोजी मुंबईतील त्यांच्या वर्षा निवासस्थानी इतिहासात प्रथमच संत शिरोमणी श्रीनामदेव महाराज यांचा ६७४ वा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली.
भिसे म्हणाले , पालखी सोहळा पत्रकार संघ आणि भागवत धर्म प्रसारक मंडळ महाराष्ट्र राज्यासह महाराष्ट्रातील विविध नामदेव शिंपी समाज संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत इतिहासात प्रथमच शासकीयस्तरावर संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यास पंजाब प्रांतातील श्रीनामदेव दरबार कमिटीचे विश्वस्थ तसेच महाराष्ट्रातील पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना व राज्यातील विविध नामदेव शिंपी समाज संघटनाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत .
संत नामदेव महाराज हे भागवत धर्माचे आद्य प्रचारक आहेत. संत ज्ञानदेव व संत नामदेवांनी उत्तर भारत परिक्रमा करुन भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला आहे. संत नामदेवांचे जन्मस्थान श्रीक्षेत्र पंढरपूर आहे तर श्रीक्षेत्र घुमाण (पंजाब) व श्रीक्षेत्र पंढरपूर या दोन्ही ठिकाणी त्यांची समाधी आहे.
दि. २ ऑगस्ट दुपारी १२ वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा नामदास वाडा व नामदेव पायरी येथे साजरा होत आहे.