‘स्वेरी’ हे पंढरपूर तालुक्यातील एकमेव कौशल्य विकास केंद्र
पंढरपूर (प्रतिनिधी) – कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा' च्या अनुषंगाने आज वर्ध्यात भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी विविध विकास कार्याचे उदघाटन केले. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद स्वेरीतील विद्यार्थ्यांनी घेतला. मा. पंतप्रधान मोदी यांनी शिक्षण विषयक नवीन योजना, समृद्धीपूरक उपक्रम व धोरणासंबंधी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ आणि पदवी अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीच्या अभियांत्रिकी (पदवी व पदविका) महाविद्यालयात या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे हे देखील उपस्थित होते. व्हर्च्युअल कॉन्फरन्स (दुरदृष्य प्रणाली) द्वारे या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले होते. स्वेरी डिप्लोमाच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलमध्ये, तसेच इंजिनिअरिंगच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हॉलमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली होती. या योजनेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील व्यवसायिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक युवतींना व्हावा, राज्यामधील १०३० नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या मा. मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता यांचा मानस आहे. त्यापैकी पंढरपूर तालुक्यामधून फक्त स्वेरी महाविद्यालयाची निवड केली आहे. या योजनेद्वारे स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये सिव्हील सर्वेअर आणि ड्रॉप्समन मेकॅनिकल या दोन ट्रेनिंग प्रोग्रामला मान्यता मिळाली आहे. तर डिग्री इंजिनिअरिंगमध्ये सर्वेअर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रोडक्ट डेव्हलपमेंट या दोन ट्रेनिंग प्रोग्रामला मान्यता मिळाली आहे. या चारही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश क्षमता प्रत्येकी ३० विद्यार्थी एवढी आहे. सदरील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण मोफत स्वरुपात मिळणार आहे. या महत्वाच्या ट्रेनिंग प्रोग्रामामुळे स्वेरीमध्ये नव्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडणार आहे.
या थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये प्रा. व्ही. एस. स्वामी, प्रा. अमेय भातलवंडे, डिग्री इंजिनिअरिंगमधील प्रा. ए.ए.मोटे, प्रा. एस.ए. इनामदार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.