3 ट्रॅक्टर ट्रॉलीसह केले जप्त तर एक होडी केली नष्ट
पंढरपूर (प्रतिनिधी) : अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. शेगाव दुमाला येथे भीमा नदीपात्रात महसूल पथकाने अवैध वाळू व वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे 3 ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले आहे. तर शिरढोण येथे भीमा नदीपात्रात एक लाकडी होडी नष्ट करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणार्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन लंगुटे यांनी पथकांची नेमणूक केली आहे. त्यासाठी दररोज रात्री 8.00 ते सकाळी 8.00 वाजेपर्यंत तसेच दिवसा उत्खनन व वाहतुक होत असलेल्या विशिष्ट ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत.
शेगाव दुमाला येथे दि 19 रोजी दुपारी 4.30 च्या सुमारास येथील भिमा नदी पात्रालगत अवैधरित्या वाळु काढण्यासाठी जात असताना तीन ट्रॅक्टर पकडून शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे जमा केले आहेत. सदर वाहनांच्या मालकांवर महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्याची कार्यवाही सुरु आहे. ही कारवाई महसुल नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी तुंगत, तलाठी शेगांव दुमाला, सहाय्यक तलाठी शेगांव दुमाला, पोलीस कर्मचारी, कोतवाल व पोलीस पाटील यांनी केली आहे.
तर दुसर्या घटेनेत दि. 21 रोजी दुपारी 4.45 च्या सुमारास शिरढोण (ता. पंढरपूर) येथील नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणार्या दोन लाकडी होड्या पकडून कटरच्या सहाय्याने कापून नष्ट करण्यात आल्या आहेत. ही कारवाई मंडळ अधिकारी पंढरपूर, तलाठी शिरढोण, तलाठी पंढरपूर व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आली आहे.