बारा लाख १० हजार किमतीचे १८ तोळे सोने, चोरीचा ऐवज जप्त
दोन चोरट्याना जेरबंद करण्यात यश
पंढरपूर (प्रतिनिधी) - शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरीने सोनसाखळी चोरी करणा-या दोन चोरांकडून अंदाजे १२ लाख १० हजार किंमतीचा (अंदाजे १८ तोळे सोने) मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
सदर कामगीरी पंढरपूर शहर पोलीसांनी, अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्हयातील जबरी चोरीस प्रतिबंध करणेच्या आदेशान्वये डॉ. अर्जुन भोसले, सहा पोलीस उपअधिक्षक पंढरपुर विभाग पंढरपुर, विश्वजीत घोडके वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली केली.
पंढरपुर येथे दिनांक २८ ऑगस्ट रोजी फिर्यादी डॉ. सौ. मैत्रेयी मंदार केसकर वय ४५ वर्षे रा. शाकुंतल नगर, इसबावी, पंढरपूर यांच्या अंगावर चटणी टाकुन त्यांना ढकलुन देवून गळयातील ४४.६६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे गंठण काळे मनी व सोन्याच्या वाटी असलेले बळजबरीने हिसकावुन तोडून जबरी चोरी करून तेथुन दोन अज्ञात इसम मोटार सायकल वरून निघुन गेले आहेत म्हणुन अज्ञात इसमांविरुध्द पंढरपुर शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झाल्याने पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचारी यांचे दोन पथक तयार करून पेट्रोलिंग करण्या करीता रवाना केली व ट्रॅफिक कर्मचारी यांना नाकाबंदी करून अज्ञात मोटार सायकल वरील आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. अज्ञात आरोपीचा व मोटार सायकलचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी स्टेशन रोड ते टाकळी रोड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना दोन संशयीत इसम मोटार सायकल वरून जात असताना दिसले त्यांना मोटार सायकल थांबविण्यास सांगितले असता ते मोटार सायकल वरून पळून जात असताना पडले. त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणल्यानंतर दोन पंचा समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी विनोद गोविंद पिंपळे रा. उजनी कॉलनी, श्रीपुर ता. माळशिरस याचे जरकीन मध्ये गुन्हयातील गेलेला माल ३,३१,०२६/-रू.चे एक ४४. ६६० ग्रॅम वजनाचे फिर्यादीचे सोन्याचे मोठे गंठण काळे मनी व सोन्याच्या वाटी, अर्धी अंबारी कंपनीची लाल चटणीची पुडी मिळून आली. आरोपी महादेव शंकर पवार रा.श्रीपुर ता. माळशिरस जि. सोलापूर यांनी गुन्हा करताना वापरलेली होन्डा कंपनीची युनीकॉर्न मॉडेलची बिना नंबर असलेली मोटार सायकल असा मुद्देमाल त्यांचेकडे मिळाल्याने तो गुन्हयाचे तपासात जप्त केला असून त्यांना अटक केल्यानंतर त्यांचे कडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत ४ गुन्हे केले असल्याची कबुली दिल्याने त्या ४ गुन्हयांतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
वरील दाखल असलेल्या गुन्हयाची कबुली दिली.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अशिष कांबळे, राजेश गोसावी, नागनाथ कदम, बिपीनचंद्र ढेरे, सुरज हेंबाडे, शरद कदम, सिरमा गोडसे, पो हे नितीन पलुसकर, सचिन हेंबाडे, नवनाथ माने, शहाजी मंडले, समाधान माने, बजरंग बिचुकले, निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीणचे योगेश नरळे यांनी केली आहे.