33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न्
पंढरपूर (प्रतिनिधी) - भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस दराच्या स्पर्धेत उतरुन आत्तापर्यत एफआरपी पेक्षा जादा व इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर दिला आहे. येणाऱ्या गळीत हंगामात ही परंपरा कायम ठेवण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असेल. त्यासाठी ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे भक्कम साथ संचालक मंडळाला द्यावी, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले. दरम्यान, कारखान्याची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. वार्षिक सभेतील सर्व विषयांस उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात व एकमताने मंजूरी दिली.
कारखान्याची अधिमंडळाची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर उत्साहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले, राजेंद्र शिंदे व संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती. गळीत हंगाम 2023-24 चा आढावा घेताना कल्याणराव काळे पुढे म्हणाले, गेल्या गळीत हंगामात ॲडव्हान्स देवुनही निम्यापेक्षा जास्त तोडणी वाहतुक यंत्रणा आली नाही. त्याचा परिणाम सुरुवातीच्या दैनंदिन गाळपावर झाला. राज्य् शासनाच्या हमीवर एमएससी बँकेकडून पहिल्या टप्यातील कर्ज प्रत्यक्षात हंगाम सुरु झालेनंतर कारखान्याच्या खात्यावर जमा न होता संबंधितांच्या बँक खात्यावर जमा झाले. जवळपास आठ्यान्न्व कोटी रुपये एमएससी बँकेने कर्जात भरुन घेतले. गेल्या हंगामात दैनंदिन गाळप क्षमतेएवढा ऊस उपलब्ध होण्यासाठी कमी पडणारी ऊस वाहतुक यंत्रणा उभी करण्यासाठी सर्व सहकारी संचालक, कार्येकर्ते यांनी परिश्रम घेतल्यामुळेच गेल्या हंगामात 2 लाख 37 हजार टन ऊस गाळप आपण करु शकलो.
येणारा 2024-25 गळीत हंगामाबाबत बोलताना कल्याणराव काळे पुढे म्हणाले, या हंगामात दैनंदिन तीन ते साडेतीन हजार टन ऊस गाळप होण्याच्या दृष्टीने ट्रक, ट्रॅक्टर, बजॅट, बैलगाडी यांना पहिला हप्ता दिलेला असून, दुसऱ्याचे नियोजन सुरु आहे. कारखान्यातील देखभाल, दुरुस्तीची कामेही अंतिम टप्यात आहेत. या हंगामात साडेचार लाख टन ऊस गळीताचे उद्दिष्ट् व्यवस्थापनाने ठेवलेले आहे. ऊस तोडणी मजुर, मुकादम, वाहन मालकास संचालक मंडळाने नेहमीच सहकार्य केले आहे. ज्या वाहन मालकांच्या टोळ्या पळून गेल्या त्यांचा ॲडव्हान्स् वसुल करताना बऱ्याच वाहन मालकांचे व्याज वसुल केलेले नाही, अडवणुक केलेली नाही. ग्रामिण भागातील ऊस उत्पादक शेतकरी व या उद्योगावर अवलंबुन असणाऱ्या अनेक कुटुंबांचे आर्थिक सक्षमिकरण या साखर उद्योगावर अवलंबुन आहे. त्यामुळे या उद्योगाला आर्थिक स्थैर्य येण्यासाठी केंद्र शासनाने एफआरपीच्या तुलनेत साखर, आरएस, इथेनॉल, इएनए यांची एमएसपीही वाढविण्याची गरज असून, तशी मागणी महाराष्ट्र व केंद्र शासनाकडे केली आहे
स्व.वसंतराव दादांनी या परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, इथल्या शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त् करुन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी या साखर कारखान्याची उभारणी केली. त्यांच्या आचार विचारांचा वारसा जपत गेली 24 वर्षे हा कारखाना तुम्हा सभासद शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, कार्येकर्ते, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नातुन वाटचाल करतोय. साखर उद्योगाला को-जनरेशन, डिस्टीलरी अशा पूरक उद्योगांची जोड देत सहकाराला सामाजिक, अध्यात्मिक, वैद्यकीय, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा अशा विविध क्षेत्रांची जोड देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न् आहे. हंगाम 2024-25 मध्येही कार्यक्षेत्रासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यास आपला संपूर्ण ऊस गळीतासाठी पाठवुन हा हंगाम यशस्वी करावा, असे आवाहनही शेवटी कल्याणराव काळे यांनी केले.
प्रारंभी कारखान्याचे संस्थापक स्व. वसंतरावदादा काळे आणि विठुमाऊली यांच्या प्रतिमेचे पुजन पिराची कुरोलीचे माजी सरपंच तुकाराम मारुती माने व सरकोलीचे माजी उपसरपंच तात्यासाहेब दत्तु भोसले यांचेहस्ते करण्यात आले. वार्षिक सभेच्या नोटीसचे वाचन कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक पोपटराव ज्ञानेश्वर घोगरे यांनी करुन सर्व विषयांना मंजुरी घेतली. वार्षिक सभेच्या अध्यक्षपदासाठी कल्याणराव काळे यांचे नांव संचालक दिनकर कदम यांनी सुचविले, त्यास माजी व्हा.चेअरमन व संचालक राजेंद्र शिंदे यांनी अनुमोदन दिले. श्रध्दांजलीचा ठराव पंचायत समितीचे माजी सदस्य् सुरेश देठे यांनी मांडला. उपस्थितांचे स्वागत संचालक युवराज दगडे यांनी केले. आभार संचालक मोहन नागटिळक यांनी मानले. सुत्र संचालन रावसाहेब पवार यांनी केले.
सभेस कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर सर्वश्री संचालक राजेंद्र शिंदे, मोहन नागटिळक, गोरख जाधव, आण्णा शिंदे, राजाराम पाटील, दिनकर कदम, तानाजी सरदार, योगेश ताड, युवराज दगडे, नागेश फाटे, परमेश्वर लामकाने, संतोष भोसले, जयसिंह देशमुख, सुनिल सराटे, अमोल माने, अरुण नलवडे, संचालिका उषाताई माने, संगिता देठे, माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले, मा.संचालक पांडुरंग कौलगे, प्रताप म्हेत्रे, विलास जगदाळे, इब्राहिम मुजावर, भारत गाजरे, तात्या गंगथडे, राजाभाऊ माने, संभाजी बागल, अरुण बागल, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक महादेव देठे, उत्तम नाईकनवरे, यशवंत सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन विष्णु यलमार, भाळवणी ग्रामपंचायतीचे सरपंच रणजीत जाधव, दाऊद शेख, कारखान्याचे सभासद, शेतकरी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.