पंढरपूर (प्रतिनिधी) - "रयत शिक्षण संस्था ही पुरोगामी विचारांची संस्था असून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील ही महापुरुषांनी महाराष्ट्राला दिलेली फार मोठी देणगी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचार आणि कार्याचा फार मोठा प्रभाव होता. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधकीय चळवळीतून रयत शिक्षण संस्थेचा जन्म झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीमध्ये रयत शिक्षण संस्थेचा फार मोठा आणि महत्त्वाचा वाटा आहे." असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय आणि यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव ऑडिटर प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अभिजीत आबा पाटील, सुनेत्राताई पवार, बाळासाहेब पाटील वरवडे, बाळासाहेब पाटील रोपळे, रयतच्या लाईफ मेंबर बोर्डाचे सदस्य संदीप भुजबळ डॉ. राजेंद्र जाधव, सेवानिवृत्त प्राचार्य डी.जे. साळुंखे, नारायण गायकवाड रोपळे, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य डॉ. तुकाराम अनंतकवळस, उपप्राचार्य प्रा. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे पुढे म्हणाले की, "महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाच्या उद्धाराचे जे कार्य केले, त्यांनी आपल्या कार्यातून बहुजनांच्या मनात ज्ञानाची लालसा निर्माण केली. यातूनच बहुजन समाजाला शिक्षण देण्याची प्रेरणा कर्मवीर भाऊराव पाटील यांना मिळाली. देशांमध्ये पुढारलेल्या महाराष्ट्राचे जे चित्र निर्माण झालेले आहे; त्याच्या मुळाशी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घेतलेले श्रम आणि त्यांनी केलेला संघर्ष त्याच्या मुळाशी आहे. जोपर्यंत आपण फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा समजून घेणार नाहीत. तोपर्यंत आपणास कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची उंची कळणार नाही. कर्मवीरांनी 'कमवा आणि शिका' हा मूलमंत्र समाजाला दिला. यातून श्रमप्रतिष्ठा, सुसंस्कार, स्वाध्याय, स्वाभिमान यांची जपणूक मोठ्या प्रमाणात झाली. म्हणूनच आज महाराष्ट्र सर्व बाबतीत आपणास सुधारलेला दिसतो. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्यामुळेच देशाच्या विविध क्षेत्रात महिलांचे नेतृत्व सक्षमपणाने पुढे येताना दिसते. शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला."
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे म्हणाले की, "सध्या शिक्षण व्यवस्था अतिशय गतीने बदलत आहे. मोबाईल आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव या व्यवस्थेमध्ये झालेला आहे. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुकर होण्यासाठी मोबाईल आणि तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करावा. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावलेल्या फांदीचा आज वटवृक्ष झालेला दिसतो. 'कमवा आणि शिका' या योजनेतून अनेक विद्यार्थी घडले आहेत. रयत शिक्षण संस्था ही समाजाच्या मदतीवर उभारलेली संस्था आहे. अज्ञान आणि दारिद्र्याच्या विरोधात ही संस्था लढते."
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत खिलारे यांनी केले. तर मान्यवरांचा परिचय डॉ. रमेश शिंदे यांनी करून दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 108 प्रतिकृती आणि आर्टिफॅक्टचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त सेवक प्राध्यापक वाय. एन. माने यांनी एक लक्ष रुपयाचा धनादेश देणगी म्हणून संस्था पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला; त्यानिमित्ताने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सीनियर ज्युनियर वोकेशनल विभागातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर सेवक सेवानिवृत्त रयत सेवक पालक पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी एनसीसी विभागाच्या कॅडेटने मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर दिला. याचे नियोजन कॅप्टन डॉ. समाधान माने यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे व प्रा. सारिका भांगे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन प्रमुख अमोल जगदाळे सागर नखाते, अभिजीत जाधव, अमोल माने, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका अनिता साळवे यांनी मानले.