भक्ती चळवळीने सर्वसामान्यांना अध्यात्माचा अधिकार दिला हीच खरी क्रांती – प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे

0
             पंढरपूर (प्रतिनिधी) - “पंढरपूरचा विठ्ठल हा सर्वसामान्य माणसांचा देव आहे. तो सर्वांनाच सहज उपलब्ध होतो. सहाव्या आणि सातव्या शतकात भक्ती चळवळ दक्षिण भारतात निर्माण होऊन ती संपूर्ण देशभर पसरली. संस्कृत भाषेत अडकलेले ज्ञान सर्वसामान्य माणसांना उपलब्ध करून देवून त्यांना भक्तीच्या चळवळीत सामील करून घेण्याचे फार मोठे काम मराठी संतांनी केले आहे. कर्मकांडात अडकलेले आध्यात्म भक्ती चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिले ही खरी क्रांती होती.” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या ऑडीट विभागाचे सहसचिव तथा छत्रपती शिवाजी कॉलेज साताराचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी केले. 
           येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा कंपोनंट आठ अंतर्गत इतिहास विभागाच्या वतीने ‘भक्ती चळवळ: ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि तात्विक दृष्टिकोनातून अभ्यास’ या विषयावरील एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.  यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. धनाजी मासाळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विष्णू वाघमारे, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य डॉ. तुकाराम अनंत कवळस, उपप्राचार्य प्रा. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, सेवानिवृत्त डॉ. विकास कदम, सेवानिवृत्त डॉ. हनुमंत लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. 
         प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे पुढे म्हणाले की, “मराठीसह अनेक प्रादेशिक भाषेत अध्यात्माचे तत्त्वज्ञान सामान्यांना अवगत करता येईल. असा भक्तीचा साधा आणि सोपा मार्ग संतांनी उपलब्ध केला. ही भक्ती चळवळीची खरी ताकद आहे. त्यामुळेच सर्वसामान्य जाती, पंथातील आणि धर्मातील संत निर्माण होवू शकले. मोक्षाची वेगळ्या स्वरूपातील संकल्पना विकसित करण्याचे कार्य संतांनी केले.” 
         चर्चासत्राचे बीजभाषण करताना डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले की,”मध्ययुगीन कालखंडात देशात राष्ट्रीय भावना अस्तित्वात नव्हती. आठशे पासष्टहून अधिक संस्थाने भारतात अस्तित्वात होती. त्या संस्थांमध्ये एकोप्याची भावना नव्हती. बादशहा अकबर हा सौदर्य दृष्टी लाभलेला ज्ञानोपासक राजा होता. त्याच्या दरबारात किताबखाना म्हणून स्वतंत्र ग्रंथालय होते. रामायण आणि महाभारत यासारख्या ग्रंथामध्ये प्रसंग चित्रे रेखाटण्यासाठी साठहून अधिक चित्रकार होते. त्यांना स्वत: रंग तयार करून त्याचा वापर करावा लागत असे. तंजावर येथील सरफोजी राजे भोसले हा ज्ञानउपासक राजा होता. त्यांनी जगभरातून देव आणि धर्म विषयक अनेक ग्रंथांचे संकलन केले होते. ख्रिस्ती धर्माच्या प्रचार आणि प्रसाराला येथील भक्ती चळवळ हा फार मोठा अडसर होता. छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्माण करण्यात पृष्ठभूमी तयार करण्याचे काम भक्ती चळवळीने केले.” 
   या चर्चासत्रात तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. सतीश कदम, प्रा. डॉ. विष्णू वाघमारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात प्राध्यापक, शिक्षक  आणि संशोधक विद्यार्थी यांनी भक्ती चळवळीच्या संबंधित विषयावर संशोधन पेपर सादर केले. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. रविराज कांबळे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांच्या परिचय डॉ. उमेश साळुंखे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती सुडके यांनी केले.  हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी या चर्चासत्राचे समन्वयक प्रा. डॉ. दत्तात्रय चौधरी, प्रा. श्रीमती सुमन केंद्रे, प्रा. कल्याण वाटाणे, प्रा. बाळासाहेब गायकवाड, प्रा. मयूर चव्हाण आदी शिक्षक तर अभिजित जाधव, ओंकार नेहतराव, अमोल माने, सुरेश मोहिते आदी शिक्षकेतर सेवकांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. विनोद आखाडे यांनी मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)