हुशारीला चिकाटीची जोड दिल्यास करिअरमध्ये यश अटळ – प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे

0
स्वेरीत प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ संपन्न

           पंढरपूर (प्रतिनिधी) - 'ध्येय साध्य करण्यासाठी ज्या गोष्टी करायला आवडत नाहीत त्या गोष्टी प्रयत्नपूर्वक करणे गरजेचे आहे. यासाठी वेळप्रसंगी मनावर देखील सकारात्मक दादागिरी केली पाहिजे. अभियांत्रिकीमधून करिअर करताना कोणती ब्रँच मिळाली हे महत्वाचे नाही, त्यापेक्षा मिळालेली ब्रँच ही जगातील सर्वोत्तम ब्रँच आहे असे समजून त्या ब्रँचला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे कारण करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी ‘हार्ड वर्क’ करण्याची गरज आहे. ‘हार्ड वर्क’मुळे हुशारी देखील वाढते. हुशारीला चिकाटीची जोड दिल्यास करिअर मध्ये हमखास यश मिळते.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.
           गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट मधील अभियांत्रिकीच्या पदवी, पदविका व एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष तसेच थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगला प्रवेश घेतलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी आयोजिलेल्या स्वागत समारंभा प्रसंगी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे हे मार्गदर्शन करत होते. व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणुन प्रताप वाघ व महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ.वैशाली स्वामी हे उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी प्रास्ताविकात ‘ग्रामीण भागात स्वेरीची सुरवात केलेल्या डॉ. बी. पी. रोंगे सरांनी विद्यार्थ्यांसाठी १९९८ पासून तंत्रशिक्षणाचे दालन खुले केले. २६ वर्षांच्या कालावधीत ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी आज मोठ्या पॅकेजसह देशात आणि परदेशात स्थायिक होवून ते उत्तम करिअर करत आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात ‘स्वेरी’चा आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक आहे,' असे सांगून आजपर्यंतच्या वाटचालीतील महत्वाच्या टप्प्यांवर लक्ष वेधले. पुढे बोलताना संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.रोंगे म्हणाले की, ‘आपल्याला मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजे पण करिअरची इमारत पक्की बांधायची असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्कोप असलेल्या इंग्रजी भाषेमधून संभाषण करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये बदल करणे आणि करिअरच्या दृष्टीने त्यांची सर्वोत्तम तयारी करून घेणे हाच स्वेरीचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी आमचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सज्ज आहेत. स्वेरीमधून नापास होणे ही बाब अत्यंत अवघड आहे तर गुणवत्ता यादीत येणे, फर्स्ट क्लासमध्ये पास होणे या बाबी मात्र स्वेरीत खूप सोप्या आहेत म्हणून पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या माध्यमातून स्वेरीवर टाकलेला विश्वास मुळीच वाया जाणार नाही.’ असे सांगून विद्यार्थ्यांनी टीव्ही, मोबाईल, तथाकथित मित्र व आपल्या स्वतःचा नकारात्मक दृष्टीकोन या चार गोष्टींपासून दूर राहण्याचा कानमंत्रही प्राचार्य डॉ. रोंगे यांनी दिला.
          याप्रसंगी गोपाळपूरचे माजी उपसरपंच विक्रम आसबे, संभाजी शिंदे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्नेहा रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. करण पाटील, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व विविध भागांतून आलेले त्यांचे पालक असे मिळून सुमारे चार हजारांहून अधिक विद्यार्थी व पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. 

---------------------------------------------------
         स्वेरी कॅम्पस मधील भाषा ही इंग्रजी असल्याने प्राचार्य डॉ. रोंगे सर देखील सर्वांशी इंग्रजीमधूनच संवाद साधतात पण आज स्वागत मेळाव्याला आलेल्या पालकांचा विचार करून त्यांना मराठी भाषेत संवाद साधावा लागला. ‘मराठी भाषे’त बोलण्यासाठी विद्यार्थ्यांकडून परवानगी घेण्याचे डॉ. रोंगे सर विसरले नाहीत.  
          डॉ. रोंगे सरांचे विचार ऐकण्यासाठी निरव शांतता पसरली होती तर पालकांची विक्रमी गर्दी पाहून पावसानेही व्यत्यय आणला नाही. मार्गदर्शन सत्रानंतर मात्र वरुणराजा मनसोक्त बरसला.
---------------------------------------------------

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)