प्रत्येक तालुक्यात एक हजार मराठा उद्योजक तयार झाले पाहिजेत - नरेंद्र पाटील

0
एक लाख मराठा उद्योजक संकल्पपुर्ती निमित्त जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या पंढरपूर उपकेंद्राचे उद्घाटन
            पंढरपूर (प्रतिनिधी) -  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन राज्यात एक लाख तर सोलापूर जिल्ह्यात 10 हजार उद्योजक तयार झाले. महामंडळाच्या व्याज परतावा योजनेमुळे नव्या उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.  पंढरपूर येथे नव्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपकेंद्र सुरु करण्यात आले असून, महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात एक हजार मराठा उद्योजक तयार झाला पाहिजे असे प्रतिपादन अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
          अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात 1 लाख मराठा उद्योजक संख्या पूर्ण झाली. त्यानिमित अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, लोकमंगल बँक, पंढरपूर अर्बन बँक, निशिगंधा बँक व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मराठा उद्योजक जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा श्रीयश पॅलेस, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यास आमदार समाधान आवताडे, लोकमंगल बँक, पंढरपूर अर्बन बँक, निशिगंधा बँक अधिकारी पदाधिकारी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी तसेच मराठा उद्योजक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
          यावेळी श्री. नरेंद्र पाटील म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व सहकारी बँकेने महामंडळाच्या योजनेच्या लाभार्थ्यांना सहकार्य केले त्यामुळे जिल्ह्यात अनेक मराठा उद्योजक महामंडळाच्या माध्यमातून उभे राहिले आहेत. ग्रामीण भागातील मराठा तरुणांनी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन गावातच उद्योग व्यवसाय सुरू करावा. त्यातून आपली व समाजाची आर्थिक उन्नती करावी. तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्हे व तालुक्यांचा दौरा करुन महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी युवकांना उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन करुन मराठा समाजातील तरुण-तरुणींना उद्योजकांच्या प्रवाहात सामील केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शासनाकडून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. सारथीमार्फत देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करीत आहेत.
            पंढरपूर येथे सुरु करण्यात महामंडळाच्या  उपकेंद्राचा   सांगोला, मंगळवेढा, माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असून, जास्तीत-जास्त मराठा समाजातील तरुणांनी याचा लाभा घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.  जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकानी  योजनेच्या लाभार्थ्यांना दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
           यावेळी आमदार समाधान आवताडे म्हणाले, जिल्ह्यामध्ये महामंडळाच्या  माध्यमातून सुमारे 25 हजार  लाभार्थी म्हणजे 25 हजार उद्योजक होण्याची संधी दिली. पंढरपूर येथील अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या उपकेंद्राच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील तसेच परिसरातील मराठी तरुणांना लाभ होणार आहे. जास्तीत-जास्त मराठी तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच या योजनेचा लाभ घेतल्यास त्याचा परतावाही वेळेत करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
          यावेळी यशस्वी उद्योजक व लाभार्थी रोहित पवार यांनी आपले अनुभव कथन केले. तसेच अर्जुन पवार, प्रणव परिचारक यांनी मेळाव्यात आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी  योजनेचे लाभार्थी तसेच राष्ट्रीयकृत व सहकारी बँकेच्या अधिकारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

          पंढरपुरातील महामंडळाच्या उपकेंद्राचे उदघाटन

       पंढरपूर येथील  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या उपकेंद्राचे उद्घाटन  अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या महामंडळाच्या  उपकेंद्राचा  सांगोला, मंगळवेढा, माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना फायदा होणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)