सिनेमा आणि नाटक कलावंतांनी सातत्याने पुस्तकांचे वाचन करावे – दिग्दर्शक कुमार सोहोनी

0
पाच दिवसीय नाट्य-कार्यशाळा संपन्न 

           पंढरपूर (प्रतिनिधी)– “अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण लक्षात घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सिनेमा आणि नाटक कलावंतांनी सातत्याने विविध पुस्तकांचे वाचन करावे. विशेषत: आत्मकथने, चरित्रग्रंथ आणि कादंबरी या प्रकारच्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. आपण जन्मत: नाटक करत असतो. आपणास वेगळा अभिनय करण्याची आवश्यकता नसते. तरीही या क्षेत्रातील बारकावे समजून घेतले पाहिजे. याक्षेत्रात सातत्याने कार्यरत राहिले तरच यश संपादन करता येते.” असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी केले.  
            रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा काम्पोनंट आठ अंतर्गत मराठी विभाग व कामाक्षी क्रिएटिव्ह मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय नाट्यकार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या नाट्य कार्यशाळेच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते. 
          कुमार सोहोनी पुढे म्हणाले की, “नाटक ही साहित्यातील सर्वात अवघड कला आहे. आपल्या विश्वातील अनुभव तो कागदावर उतरवतो. तो लिहिताना लेखकास नाटक सद्रीक्र्नाचे भान असावे लागते. प्रत्येक लेखक नाटक पहात असतो म्हणूनच तो नाटक लिहू शकतो. नाटक सादरीकरणात तुमच्या मधील कलांना मंचीत करण्याची आवश्यकता असते अभिनयात अंग प्रत्यांगाचा खुबीने वापर करावा लागतो. ”
           अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “कला आणि क्रीडा क्षेत्रातील लोक स्वत:च्या तब्बेती संबंधाने खूप जागरूक असतात. सिनेमा आणि नाटक या क्षेत्रातील माणसांचे मोठेपण दिसते. पण त्यापाठीमागे त्यांनी घेतलेले श्रम विशेष महत्त्वाचे असतात. शारीरिक आणि बौद्धिक श्रमांची विद्यार्थ्यांनी सवय करून घेतली पाहिजे.” 
            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश शिंदे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय राकेश तळगावकर यांनी करून दिला. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उमेश घळसासी, डॉ. सोमनाथ सोनवलकर, आकाश भडसावळे, निलम चव्हाण, शांताराम सावंत आदी तज्ज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमात महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अमर कांबळे, डॉ. समाधान माने, प्रा. हरिभजन कांबळे, प्रा. उज्ज्वला शिंदे, डॉ. बापूसाहेब घोडके, डॉ. सुमित साळुंखे व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. दत्ता डांगे यांनी मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)